तळकटची श्रध्दा नांगरे बेस्ट अॅथलेटिक्स
By admin | Published: February 2, 2015 10:30 PM2015-02-02T22:30:41+5:302015-02-02T23:50:54+5:30
यामध्ये सलग तीन वर्षे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली व महिला विभागात बेस्ट अॅथलेटिक्स पदाचा मान मिळविला.
कसई दोडामार्ग : दोडामार्ग भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व्हेअर पदावर काम करणारी तळकट येथील श्रध्दा चंद्रकांत नांगरे हिने याहीवर्षी क्रीडा स्पर्धेत १० सुवर्णपदकांची कमाई करून ‘बेस्ट अॅथलेटिक्स प्लेअर’चा मान पटकावला आहे. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व थरातून अभिनंदन होत आहे. तळकट या ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन श्रध्दा नांगरे यांनी डिप्लोमा इंजिनियरपर्यंत शिक्षण पूर्ण करून तीन वर्षांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयात सर्व्हेअर या पदावर नोकरीला लागली. सर्व्हेअर म्हणून काम करीत असतानाच तिने खेळांचाही छंद जोपासून भूमी अभिलेख कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये सलग तीन वर्षे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली व महिला विभागात बेस्ट अॅथलेटिक्स पदाचा मान मिळविला. सन २०१२-१३ मध्ये भूमी अभिलेख क्रीडा स्पर्धेत नऊ सुवर्ण व कांस्यपदके, २०१३-१४ मध्ये बारा सुवर्ण व एक कांस्य पदकांची कमाई केली. तसेच ‘बेस्ट अॅथलेटिक्स प्लेअर महिला २०१४’ हा पुरस्कार तिने प्राप्त केला.
यावर्षी या विभागामार्फत मुंबई-चेंबूर येथे झालेल्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये पाच सुवर्ण पदके तसेच गोरेगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके तेच बेस्ट प्लेअरचा मान मिळविला. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर व २०० मीटर धावणे, गोळा फेक, भालाफेक, लांबउडी या खेळांमधून तिने दहा सुवर्ण पदकांची कमाई केली. याकामगिरीने तिने दोडामार्ग तालुका व भूमी अभिलेख कार्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत भूमी अभिलेखचे उपअधीक्षक महेश गावकर, तसेच कार्यालयातील सहकर्मचारी व आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि सहकार्य मिळाल्यानेच आपण हे यश मिळवू शकले, अशी प्रतिक्रिया श्रध्दा नांगरे हिने व्यक्त केली. (वार्ताहर)