बनावट खतांचा सुळसुळाट वाढला

By admin | Published: June 10, 2015 11:24 PM2015-06-10T23:24:31+5:302015-06-11T00:27:07+5:30

भातशेती हंगाम : देवगडमध्ये कृषी विभागाचे दुर्लक्ष, परजिल्ह्यातील एजंट

False fertilizer increased | बनावट खतांचा सुळसुळाट वाढला

बनावट खतांचा सुळसुळाट वाढला

Next

पुरळ : देवगड तालुक्यामध्ये सेंद्रिय व रासायनिक बनावट खते सध्या विकली जात असून, याकडे कृषी विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. परजिल्ह्यातील काही एजंट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बनावट खते विकत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यामध्ये भातशेतीसाठी रासायनिक खतांचा सर्रास वापर केला जातो. तसेच आंबा कलमांना सेंद्रिय व रासायनिक खते वापरली जातात. काही नामांकित कंपन्यांची खते वगळता बनावट खते काही एजंट राजरोसपणे येथील शेतकऱ्यांना विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सेंद्रिय खतेही बऱ्याचशा प्रमाणात बनावट असल्याचे सांगण्यात येत आहे. गेली चार ते पाच वर्षे बनावट खते विकून एजंटांनी आपले बस्तान तालुक्यामध्ये मजबूत केले आहे.
काही गावातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून बनावट खतेही विकली जात असल्याचे बोलले जात आहे. कृषी विभागाची मान्यता नसतानाही ही खते राजरोसपणे कशी विकली जात आहेत. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष का करीत आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
देवगड तालुक्यामध्ये शेतीसाठी रासायनिक खत सुमारे ५ हजार मेट्रिक टन वापरले जाते. तसेच आंबा कलमांनाही रासायनिक खतांचा वापर केला जातो. सेंद्रिय खतांमध्ये वाळू असल्याचे आढळून आले आहे. कृषिटेक कंपनीची खते हीच योग्य असल्याचे बोलले जात आहे.
संवर्धन सेंद्रिय खत आंबा कलमांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, बनावट खते विकणारे एजंट आपले बनावट खत दर्जेदार असल्याचे शेतकऱ्यांना सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.
गतवर्षी हजारो टन बनावट खते विक्री झाल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी असतानाच यावर्षी कृषी विभागाने यावर लगाम लावण्याच्या दृृष्टीकोनातून का प्रयत्न केले नाहीत. यामुळे देवगड तालुक्यातील कृषी विभागही बनावट खतांच्या एजंटानी काबीज केला असल्याचे दिसून येत आहे.
कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रक विभागाला हप्ते मिळत असल्याने तेही हेतूपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: False fertilizer increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.