चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची फसगत

By admin | Published: August 20, 2016 10:33 PM2016-08-20T22:33:22+5:302016-08-20T22:54:20+5:30

कोकण रेल्वे : अप-डाऊन मार्गावरील गाड्यांचा प्लॅटफॉर्मवरील डबा क्रमांक सारखाच

False passengers on Chiplun railway station | चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची फसगत

चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची फसगत

Next

अतुल कामत -- रत्नागिरी  -रत्नागिरीकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेचे डबे ज्या क्रमांकाने प्लॅटफॉर्मवर लागतात, त्याचक्रमाने मुंबईकडून रत्नागिरीकडे येणाऱ्या रेल्वेचे डबे लागतील का? अप आणि डाऊन ट्रेनच्या डब्यांच्या प्लॅटफॉर्मवरील बोगीदर्शक फलकावरील क्रमांक वेगळाच असायला हवा ना... पण चिपळूण रेल्वेस्थानकाने ही करामत करून दाखवली आहे. चिपळूण स्थानकातील दोनही प्लॅटफॉर्मवर बोगीदर्शक फलकावरील क्रमांक चुकीचे लावण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांची मोठी फसगत होत आहे.
गाडी स्थानकात दाखल झाली की, आपला डबा कुठे येईल, हे सर्वसामान्य लोकांना कळते ते प्लॅटफॉर्मवर असलेल्या बोगीदर्शक फलकांवरून. स्थानकामध्ये येणाऱ्या रेल्वेत वातानुकुलीत डबा इंजिनपासून कितव्या क्रमांकाचा आहे, जनरलचा डबा कितव्या क्रमांकावर आहे, दुय्यम श्रेणीचा डबा कितव्या क्रमांकावर आहे, याची उद्घोषणा केली जाते. त्यानंतर अनेक लोक प्लॅटफॉर्मवरील बोगीदर्शक फलकावर लिहिलेल्या क्रमांकासमोर जाऊन उभे राहतात. ही सर्वसाधारण पद्धत आहे. त्यामुळे स्थानकात रेल्वे दाखल झाल्यानंतर प्रवाशांची धावपळ होत नाही.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचे इंजिन सर्वात पहिले असते आणि तेथून डब्यांचे क्रमांक मोजायला सुरूवात होते. जर गाडी त्याच्या उलट दिशेने जाणार असेल तर त्याचे बोगी दर्शक फलकावरील क्रमांक उलटेच असणे आवश्यक आहे. म्हणजेच फलकाच्या एका बाजूला गाडीच्या डब्याचा १ असा क्रमांक असेल तर त्याच्या मागच्या बाजूला २४ असाच असायला हवा. चिपळूण रेल्वे स्थानकाने याच विषयात आपली करामत दाखवली आहे. फलकावर जेथे १ क्रमांक लिहिला आहे, त्याच्या मागील बाजूसही १ असाच क्रमांक टाकण्यात आला आहे.
चिपळूण स्थानकात मुंबईकडे जाणारी रेल्वे थांबली असेल तर तिचा पहिला डबा जेथे येतो, त्या जागेवर गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वेचा पहिल्या क्रमांकाचा डबा येणारच नाही. त्यामुळे उद्घोषणा (अनाऊन्समेंट) ऐकून त्या-त्या क्रमांकावर उभे राहणाऱ्या प्रवाशांची गाडी आल्यानंतर धावपळ होत आहे.
सदरची बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांना यात काही चूक असल्याचे वाटत नाही, असा धक्कादायक अनुभवही चिपळूण रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना येत आहे.


हा घ्या पुरावा!
चिपळुणातील रेल्वे स्थानकांवरील हे चित्र! अप आणि डाऊन रेल्वेच्या बाबतीत डब्यांचा क्रमांक तोच टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. अप आणि डाऊनसाठी १३ आणि १४ क्रमांकाच्या डब्याची ही प्रातिनिधिक छायाचित्रे! कोकण रेल्वेने केलेल्या हलगर्जीपणामुळे आरक्षित आणि विनारक्षित दोन्ही प्रकारच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: False passengers on Chiplun railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.