अपक्षांची आघाडी-युतीवर टांगती तलवार
By admin | Published: October 19, 2015 10:51 PM2015-10-19T22:51:35+5:302015-10-19T23:46:07+5:30
दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक : उमेदवारांची धाकधुक तर कार्यकर्त्यांची दमछाक
दोडामार्ग : नगरपंचायत निवडणुकीत ५५ पैकी ६ उमेदवारांनी माघार घेतल्याने आणि एक अर्ज दुबार असल्याच्या कारणाने ४८ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. यात कॉँग्रेस आघाडी, युतीचे ३४, मनसेचे ४, आरपीआयचा १ आणि अपक्षांच्या ९ उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीत आरपीआयबरोबर युतीने तडजोड न केल्याने आरपीआय प्रथमच या युतीतून बाहेर पडली आहे.
दरम्यान, आघाडी आणि युतीवर अपक्षांची टांगती तलवार कायम असून माघारीनंतर उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. तर प्रमुख कार्यकर्त्यांची अकरा दिवसांच्या प्रचाराचे नियोजन आखण्याची दमछाक सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत नगरपंचायतीवर पहिल्यांदा आपलाच झेंडा फडकावयाचा या उद्देशाने प्रमुख चारही पक्ष सर्व ताकद लावून कार्यरत आहेत.
दोडामार्गात १७ जागांसाठी ५५ उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी ६ जणांनी आपले अर्ज सोमवारी मागे घेतले. निवडणुकीच्या रिंंगणात ४८ उमेदवार राहिले असून, यामध्ये काँग्रेस १०, राष्ट्रवादी ७, भाजपा ९, शिवसेना ८, मनसे ४,आरपीआय १ तर अपक्षांच्या ९ अर्जांचा समावेश आहे. १७ पैकी ४ प्रभागात चौरंगी, ७ प्रभागात दुरंगी, तर ६ प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार अपर्णा अजित देसाई यांनी आपला अर्ज मागे घेतला. तर प्रभाग क्रमांक ७ मधून फुलराणी ज्ञानेश्वर गावकर, प्रभाग क्रमांक १७ मधून देविदास कृष्णा गवस, लक्ष्मण फटी सावंत, श्रीराम जगन्नाथ गवस व संदेश दत्ताराम गवस अशा चौघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे लक्षवेधी असलेल्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये तिरंगी लढत होणार आहे. (प्रतिनिधी)
नीलेश गवस यांची बंडखोरी कायम
प्रभाग क्रमांक १७ मधून नीलेश शिवाजी गवस हे अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी उभे आहेत. दोडामार्ग पंचायत समितीचे भाजपाचे विद्यमान सभापती महेश गवस यांचे बंधू. याठिकाणी प्रभाग १७ ची जागा सेना लढवत आहे. मात्र, सभापतींच्याच बंधूंनी बंडखोरी केल्याने प्रभाग १७ लक्षवेधी ठरला आहे. ही बंडखोरी थोपविण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अपयश आले. त्यामुळे नीलेश गवस यांची बंडखोरी लक्षवेधी ठरली आहे.