सिंधुदुर्गातील ऐनारी पोलिस पाटलाच्या कुटुंबाची चौघांना मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:28 PM2023-01-23T18:28:28+5:302023-01-23T18:28:55+5:30
ठार मारण्याची दिली धमकी
वैभववाडी : ऐनारी गावच्या पोलिस पाटलाच्या कुटुंबीयांनी गावातील विशाल जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिलांना काठी, पट्ट्याने मारहाण केली. हा प्रकार शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. गाडीला बाजू देण्याच्या रागातून शुक्रवारी वादावादी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी किरण विचारे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ऐनारी गडगेवाडी येथे राहत असलेले विशाल जाधव हे मॅकेनिक असून त्यांचे एडगाव येथे गॅरेज आहे. त्यांची आई आनंदी विचारे ही ऐनारीत एकटीच राहते. शुक्रवारी विशाल पत्नी आणि मुलीसह आईला भेटण्यासाठी ऐनारीला जात होता. ऐनारी गावात जाणाऱ्या रस्त्याला गाडी गेल्यानंतर त्यांच्या गाडीच्या पाठीमागून किरण विचारे यांचा ट्रक चालला होता. बाजू देण्यासाठी विचारे यांनी जोरजोरात हॉर्न वाजवला; परंतु पत्नी आणि मुलीला गाडीतून उतरवतो आणि गाडी बाजूला घेतो, असे त्यांनी विचारेंना सांगितले; परंतु गाडी लगेच बाजूला न घेतल्याचा विचारेंना राग आला होता. हा प्रकार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला होता.
त्यानंतर शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते पत्नी व मुलीला घेऊन कारने पुन्हा ऐनारीला गेले. गाडीतून उतरताना किरण विचारे व त्यांच्या कुटुंबातील चार महिला हातात काठ्या घेऊन उभ्या होत्या. जाधव कुटुंब गाडीतून उतरताच विचारे कुटुंबातील पाच जणांनी पट्टा, काठ्या घेऊन विशाल, त्याची पत्नी व लहान मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
ठार मारण्याची धमकी
सोडविण्यासाठी आई तेथे गेली असता तिलाही त्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करीत किरण विचारे यांनी ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार विशाल जाधव याने पोलिसांत दिली आहे. जाधव कुटुंबीयांना मारहाण करणारा किरण विचारे हा ऐनारी पोलिस पाटील यांचा मुलगा असून मारहाण करणारे अन्य सर्व जण त्यांच्याच कुटुंबातील आहेत.