अपंगत्त्वावर मात करत सांभाळतोय कुटुंबाचा डोलारा
By admin | Published: March 27, 2015 09:53 PM2015-03-27T21:53:37+5:302015-03-28T00:09:53+5:30
प्रवीण मोहिते : धान्य दुकानात लेखनिकाचे करतोय काम
मंदार गोयथळे - असगोली-घरची परिस्थिती एकदम बेताची. त्यातच बालपणीच दोन्ही पायांना अपंगत्त्व आलेले यामुळे जगण्याची इच्छा जणू लहानपणीच मोडली. मात्र, जन्मताच निर्माण झालेल्या या परिस्थितीपुढे न झुकता सुरळ बौद्धवाडी येथील प्रवीण प्रकाश मोहिते हा तरुण मढाळ - पाली - सुरळ येथील सोसायटीच्या रास्त धान्य दुकानात लेखनीकाचे काम करुन आपल्या कुटुंबाचा डोलारा सांभाळतो आहे.-एखाद्याच्या आयुष्यात जन्मत: अपंगत्त्व येणे हे ज्याचे - त्याचे नशीब ठरवते. मात्र, अपंगत्त्वामुळे एखाद्याचे आयुष्यदेखील हे नशीबच बदलून टाकते, असे वारंवार बोलले जाते. परंतु, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अपंगत्त्वासारख्या कठीण परिस्थितीवर मात करुन यश मिळवलेल्या व्यक्ती आजही समाजात पाहावयास मिळतात. प्रवीणदेखील अशाच व्यक्तीच्या पंक्तीत बसतो. मूळचा सुरळ बौद्धवाडी येथील असलेला प्रवीण मोहिते हा तरुण कुटुंबात सर्वात मोठा असून सहाजिकच आपल्या घराचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. याच सर्व परिस्थितीचे भान ठेवून प्रवीण आपले मार्गक्रमण करत आहे. इयत्ता १०वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रवीणच्या कुटुंबात अन्य कोणीच कमावणारी व्यक्ती नसल्याने अपंगत्त्वातही त्याच्यावर जणू मोठे ओझे येऊन पडले. मात्र, या सर्व परिस्थितीचा विचार न करता प्रवीण सध्या उदरनिर्वाहासाठी मढाळ - पाली - सुरळ सोसायटीच्या रास्त धान्य दुकानात लेखनिकाचे काम करत आहे. मुळातच रास्त धान्य दुकानामधून मिळणारा पगार बेताचाच. मात्र, अशाही परिस्थितीशी जुळवून घेत प्रवीण आजही आपली नोकरी सांभाळून करतोय. लेखनिकाचे काम करता करता आपल्या रास्त धान्य दुकानाच्या शासकीय कामासाठी दोन्ही हातातील कुबड्या घेऊन तो तालुक्याचा प्रवास करतो. शासनाकडून प्रवीणला अपंग सायकलदेखील देण्यात आली आहे. केवळ कुटुंबाचा डोलारा न सांभाळता अभ्यासात हुशार असणारा प्रवीण इतर खेळातही आपल्या नावाप्रमाणे प्रवीण आहे. विविध स्तरावर होणाऱ्या अपंगांच्या स्पर्धांमधून तो नेहमीच यश संपादन करता आला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या १० व्या सिनियर व चौथ्या ज्युनिअर राज्यपातळीवरील अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये थाळीफेक या प्रकारात प्रथम क्रमांक तर गोळाफेक या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. रास्त धान्य दुकानात नोकरी करण्यापूर्वी प्रवीण छोटेखानी दुकान चालवत असे. मात्र, यातून मिळणारे उत्पन्न अगदीच नगण्य होते. त्यातच यादरम्यान वडिलांचे निधन झाल्याने आपल्या परिवाराची जबाबदारी प्रवीणच्या खांद्यावर पडली. प्रवीणच्या परिवारात आई, भाऊ व दोन बहिणी आहेत. यातील दोन बहिणींची लग्न झाली असून, वडिलांच्या निधनामुळे एका बहिणीच्या लग्नाची जबाबदारी प्रवीणच्या खांद्यावर आली ती त्याने यशस्वीरित्या पार पाडली. जन्मत: अपंग असल्याने ही सर्व परिस्थिती हाताळताना प्रवीणला खूप मोठी कसरत करावी लागली आहे.
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अपंगत्त्वासारख्या कठीण परिस्थितीवर मात.
इयत्ता १०वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रवीणच्या कुटुंबात अन्य कोणीच कमावणारी व्यक्ती नसल्याने अपंगत्त्वातही त्याच्यावर पडले ओझे.
धान्य दुकानाच्या शासकीय कामासाठी दोन्ही हातातील कुबड्या घेऊन तो तालुक्याचा प्रवास.
स्पर्धांमध्ये भाग घेत नेहमीच यशस्वी होतो.