घराच्या वादातून कुटुंबाला मारहाण, वृद्ध महिलेसह चौघेजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:41 AM2019-06-03T11:41:54+5:302019-06-03T11:43:01+5:30
घर मालकीच्या वादातून सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा भागात असलेल्या एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. यात एका वृद्ध महिलेसह चौघेजण जखमी झाले आहेत. घरकामासाठी आणलेले पत्रे तसेच वेल्डिंगच्या मशीनचीही मोडतोड करण्यात आली आहे.
सावंतवाडी : घर मालकीच्या वादातून सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा भागात असलेल्या एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. यात एका वृद्ध महिलेसह चौघेजण जखमी झाले आहेत. घरकामासाठी आणलेले पत्रे तसेच वेल्डिंगच्या मशीनचीही मोडतोड करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांना माहिती देऊनही पोलीस वेळेत घटनास्थळी गेले नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनाच घेराव घालत जाब विचारला. अखेर उशिरा पोलिसांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा केला.
या घटनेत वृध्देसह चौघांना मारहाण केली. मारहाण झालेल्या संबंधित वृध्देसह इतरांनी पोलिसांना माहिती दिली. पण ठाणे अंमलदार देवानंद माने यांनी वेळेत या प्रकरणाची दखल घेतली नाही. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास शिवसेनेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो, नीता कविटकर, सागर नाणोस्कर, माजी नगरसेवक सुदन आरेकर, राजू धारपवार, दीपेश शिंदे, भूषण वेंगुर्लेकर, सद्गुरू पाटील, केतन पार्सेकर, शिवा गावडे, अजय कवठणकर, केतन मुंज, निमिष पटेकर, साई खोचरे, शुभम कदम यांच्यासह तीस ते चाळीस नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना जाब विचारला.
तुम्ही एका वृध्देला मारहाण होत असताना तक्रार का दाखल करून घेत नाही, असा सवाल यावेळी केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जयवंत घोगळे यांनी तक्रार दिली असून, या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सावंतवाडी खासकीलवाडा येथील एका घराच्या मालकीवरून दोघांत वाद आहेत. येथील न्यायालयात हा वाद सुरू आहे. तर दुसरीकडे संबंधित कुटुंबाला त्या घराची दुरुस्ती करा, अशा सूचना नगरपालिकेकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या घराच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सुरू होते. मात्र, या बांधकामाला आलेल्यांनी विरोध करीत हे बांधकाम तसेच तेथील सामानाची मोडतोड केली.