Sudhir Kalingan: लोकराजा काळाच्या पडद्याआड; प्रख्यात दशावतारी कलावंत सुधीर कलिंगण यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 08:24 AM2022-02-07T08:24:12+5:302022-02-07T09:14:16+5:30
Sudhir Kalingan : कोकणातील दशावतारी नाट्यकलेतील प्रख्यात कलावंत सुधीर कलिंगण यांचं आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
सिंधुदुर्ग - कोकणातील दशावतारी नाट्यकलेतील प्रख्यात कलावंत सुधीर कलिंगण यांचं आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. काल रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना गोव्यातील व्हिजन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच उपचारांदरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनामुळे दशावतारी कलेचे फार मोठे नुकसान झाले आहे.
दशावतारी नाट्य मंडळांमधील श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचे सुधीर कलिंगण हे मालक होते. दिवंगत दशावतारी कलाकार बाबी कलिंगण यांचे ते पुत्र होते. पारंपारिक दशावतारी कलेला आधुनिकतेचा साज देते नवनवीन नाट्यप्रयोग सादर करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी दशावतारी राजा म्हणून साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या होत्या. दशावतारातील लोकराजा म्हणून त्यांची ओळख होती. त्याचप्रमाणे दशावतार कला सात समुद्र पोहोचविण्यात सुधीर कलिंगण यांचा मोठा वाटा आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील रहिवासी व प्रसिद्ध दशावतार कलाकार सुधीर कलिंगण यांच्या निधनाने नेरूरसह सिंधुदुर्गात पसरली शोककळा पसरली आहे.
दरम्यान, कलाकार दिगंबर नाईक यांनी सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आमचे अत्यंत जवळचे मित्र, दशावतार सम्राट, आमचो राजा सुधीर कलिंगण अचानक अमका सोडून गेलो. मित्रा... फसवलंस! खूपच लवकर गेलास!!! भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात दिगंबर नाईक यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.