सिंधुदुर्ग : देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध पिंपळ वृक्ष अंगणवाडीवर कोसळला, कुडासा-वानोशीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 04:46 PM2018-02-15T16:46:25+5:302018-02-15T16:50:44+5:30
देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध असलेला कुडासा-वानोशी येथील भला मोठा पिंपळ वृक्ष मंगळवारी रात्री अचानक मुळातून उखडून नजीकच्या सभागृह आणि अंगणवाडी इमारतीवर कोसळला. सुदैवाने तेथे कुणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र दोन्ही इमारतींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दोडामार्ग : देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध असलेला कुडासा-वानोशी येथील भला मोठा पिंपळ वृक्ष मंगळवारी रात्री अचानक मुळातून उखडून नजीकच्या सभागृह आणि अंगणवाडी इमारतीवर कोसळला. सुदैवाने तेथे कुणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र दोन्ही इमारतींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
वानोशी येथे मणेरी-साटेली मुख्य रस्त्याच्या बाजूला मोठे सभागृह आहे. येथील ग्रामस्थांतर्फे येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन केले जाते. या घटनेपूर्वी येथे कबड्डी स्पर्धा खेळविल्या गेल्या होत्या.
सुमारे ५० ते ६० फुटांपेक्षा जास्त उंचीचे पिंपळाचे झाड गेली अनेक वर्षे दिमाखाने उभे होते. झाडाभोवती कठडा बांधकाम करण्यात आले असून येथे धार्मिक कार्यक्रम व इतरवेळी या झाडाची पूजा केली जात होती. ह्यदेवाचे झाडह्ण अशी ओळख वानोशी गावात होती.
मंगळवारी रात्री अचानक हा पिंपळ वृक्ष सभागृहावर कोसळला. प्रचंड मोठा आवाज आल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सभागृहाचे खांब मोडून छपराचेही नुकसान झाले. लाकडी रिप, वासे मोडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. झाडाचा काही भाग बाजूला असलेल्या अंगणवाडी इमारतीवर पडून तिचेही नुकसान झाले. झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थांनी फांद्या तोडून मार्ग मोकळा केला. दरम्यान, झाड पडूनदेखील सभागृहातील देवाची घुमटी व पारिजातकाचे झाड सुरक्षित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अनर्थ टळला; सभागृहाचे दीड लाखाचे नुकसान
वानोशी येथील सभागृहात दिवसाच्या वेळी ग्रामस्थ गप्पागोष्टींसाठी बसतात. शिवाय अंगणवाडीतील मुलांचीही येथे ये-जा असते. मात्र रात्रीच्या वेळी झाड कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. सभागृहाचा निम्मा भाग जमीनदोस्त झाला असून दीड लाखाच्यावर नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य अजय परब यांनी महसूल प्रशासनाला दिली.