घाटातील प्रवास जीव मुठीत धरूनच!

By admin | Published: August 11, 2015 12:20 AM2015-08-11T00:20:25+5:302015-08-11T00:20:25+5:30

आंबोली पर्यायी मार्गाच्या प्रतिक्षेत : सरकारला केव्हा जाग येणार; आंबोलीवासीयांचा सवाल

Farewell travel farewell! | घाटातील प्रवास जीव मुठीत धरूनच!

घाटातील प्रवास जीव मुठीत धरूनच!

Next

अनंत जाधव- सावंतवाडी -आंबोली घाटातील दरड कोसळून आॅगस्टमध्ये पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र आंबोली मार्ग अद्यापपर्यंत पर्यायी मार्गाच्याच शोधात आहे. ना नवीन रस्ता, ना दरडीवर ठोस उपाय योजना अशी अवस्था आंबोली घाटाची झाली आहे. दरड कोसळली की तात्पुरती उपाय योजना केली की एक हंगाम निघाला. पुढच्या वर्षी पावसात काय ते पाहू, असे म्हणत अधिकारी व राजकीय नेते पाच वर्षे वेळ मारून नेत आहेत. मात्र, याचा परिणाम आंबोलीच्या पर्यटनावर होत आहे. त्यामुळे येणारा पर्यटक गेली पाच वर्र्षे जीव मुठीत घेऊन येतो आणि कधी जातो, हे त्यालाच माहित नसते.
आंबोली घाट हा गोव्यावरून बेळगाव, कोल्हापूरला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग तसेच महाबळेश्वरनंतरचे पर्यटन स्थळ म्हणून आंबोलीकडे बघितले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीत येतात. मात्र, या ब्रिटिशकालीन घाटाला पहिल्यांदा दरड कोसळण्याचे ग्रहण लागले ते आंबोली घाटात १९७५ साली. यावेळी पहिल्यांदा दरड कोसळली आणि आंबोलीतील वाहतूक तब्बल चार दिवस बंद ठेवण्यात आली होती, असे पूर्वीचे लोक सांगतात. पण त्यानंतर ३५ वर्षे आंबोली घाटाने अनेक उन्हाळे-पावसाळे झेलले. पण या ब्रिटिशकालीन घाटाला कोणताच धोका उद्भवला नाही, हे खरे वैशिष्ट्य. पण आॅगस्ट २०१० पासून आंबोली घाट मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.
सर्वात मोठी दरड कोसळून तब्बल १७ दिवस घाट बंद राहण्याची ही बहुतके पहिलीच वेळ होती. त्यानंतर छोट्यामोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. मात्र, आतापर्यंत या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे दरडी कोसळून कोणतीही जीवितहानी झाली नाही. सरकारला जीवितहानी झाली की जाग येणार का, असे वाटू लागले आहे. आंबोलीत आॅगस्ट २०१० मध्ये जेव्हा दरड कोसळली, तेव्हा अनेक नेत्यांनी अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वानीच आंबोली घाट आता जीर्ण झाला आहे, त्या घाटाला पर्यायी रस्ता काढला पाहिजे, आंबोली घाटाची तात्पुरती डागडुजी करूया, पुढच्या वर्षीपासून तळकटमार्गे चौकुळ-कुंभवडे रस्ता काढूया, केसरी-फणसवडे-नेनेवाडी रस्ता सुरू करूया, तर काहींनी पारपोलीतून आंबोलीला सोयीस्कर होईल, असे अनेक पर्यायी रस्त्याचे पर्याय सुचविले. पण यातील एकही पर्याय सत्यात उतरला नाही. तसेच आंबोली घाटाला घालण्यात आलेली स्वित्झर्लंडची जाळीही तात्पुरतीची मलमपट्टीच निघाली. ज्याठिकाणी पूर्वी दरड कोसळली, त्याठिकाणी दरड न कोसळता आता वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. बांधकाम विभागही लहान-मोठी उपाय योजना करून दिवस ढकलण्याचे काम करीत आहेत. मात्र, कुठेच ठोस कृती होताना दिसत नाही. या मतदार संघाचे तत्कालीन आमदार आता पालकमंत्री झाले असून त्यांनी तर केसरी-फणसवडे -नेनेवाडी मार्ग दोन वर्षात होईल, असे जाहीर केले होते. तर गडहिंग्लजचे तत्कालीन आमदार कै. बाबासाहेब कुपेकर यांनी तळकट मार्गे चौकु-कुंभवडे मार्गाला जोेर लावला होता. तर काहींनी पारपोली मार्ग आंबोलीला जोडा, असे सांगितले. पण यातील एकही मार्ग पूर्ण झाला नाही.

नवीन रस्त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद हवी
आंबोली घाटातील दरड पाच वर्षांपूर्वी कोसळली. त्यानंतर आम्ही केसरी-फणसवडे-नेनेवाडी रस्ता पर्यायी मार्ग व्हावा, म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. पण तो रस्ता अर्थसंकल्पात आला नाही. तसेच तळकट- कुंभवडे रस्त्याला मंजुरी मिळाली असून ती अर्धवट स्थितीत आहे. या रस्त्याचे प्राथमिक सर्वेक्षण चार वर्षांपूर्वीच केले आहे.
- अनामिका जाधव, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग

पर्यटन नकाशावरून गायब होण्याची भीती
आंबोलीत दरवर्षी वर्षापर्यटनाला लाखो पर्यटक येत असतात. या पर्यटकांची संख्या आता मागील पाच वर्षात कमी होऊ लागली आहेत. याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे, सततच्या दरडी कोसळणे. पर्यटकांची संख्या कमी झाली की तेथील व्यवसायावरही परिणाम होत असतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तसेच बांधकाम विभागाने यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. अन्यथा घाट एके दिवशी आंबोली पर्यटन नकाशावरूनच गायब होईल.
तत्कालीन मंत्री थोडक्यात बचावले होते
आंबोली घाटात आॅगस्ट २०१० मध्ये जेव्हा दरड कोसळली होती, तेव्हा तत्कालीन वनराज्यमंत्री भास्कर जाधव हे घाटाची पाहणी करण्यास गेले होते. मात्र, त्याचवेळी वरून एक दरडीचा दगड आला. त्यावेळी जाधव थोडक्यात बचावले होते. त्यानंतर तरी सरकार जागे होईल, असे वाटत होते. पण राजकीय आरोप- प्रत्यारोपात आंबोली घाटात जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच आहे.

Web Title: Farewell travel farewell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.