गव्याच्या हल्ल्यात चौकुळमधील शेतकरी ठार, सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 24, 2022 01:35 PM2022-11-24T13:35:14+5:302022-11-24T13:35:47+5:30
घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले
चौकुळ (सावंतवाडी) : गव्याच्या हल्ल्यात चौकुळ केगदवाडी येथील ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोनू साबा परब असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. काल, बुधवारी (दि.२३) रात्री उशिरा ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की, सोनू परब हे काही कामानिमित्त बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जंगलाच्या दिशेने गेले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाहीत. यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान परब यांचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत खालचा भाटला तळीकडे आढळून आला. याबाबत पोलीस व वनकर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.
वनकर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर परब यांचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यात झाल्याचे निर्दशनास आले. यानंतर वनविभागाचे आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके-कांबळे व कर्मचाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी पाठवला. परब यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे.