बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, सिंधुदुर्गातील चौकुळ येथील घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 12, 2023 11:58 AM2023-04-12T11:58:42+5:302023-04-12T11:59:09+5:30
भरवस्तीत हल्ला करणाऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी चौकूळ ग्रामस्थांच्यावतीने वनविभागाकडे करण्यात आली
आंबोली (सिंधुदुर्ग) : बिबट्याने मागून हल्ला केल्याने चौकुळ येथील शेतकरी गंभीर जखमी झाला. रामचंद्र उर्फ भाऊ जाधव असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. घरामागे असलेल्या गोठ्यात म्हैशींना पाणी देण्यासाठी गेले असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर अधिक उपचार करण्यात आले. ही घटना काल, मंगळवारी घडली. भरवस्तीत हल्ला करणाऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी चौकूळ ग्रामस्थांच्यावतीने वनविभागाकडे करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, जाधव हे आपल्या घरामागे बांधण्यात आलेल्या गोठ्यात म्हैशींना पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी तेथून परतत असताना बिबट्याने त्यांच्यावर मागून झडप घातली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी जाधव यानी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला.
दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना अधिक उपचारासाठी आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विद्या घोटगी, वनपाल अमोल पटेकर, भिंगारदिवे आदींनी रूग्णालयात धाव घेऊन जाधव यांची विचारपूस केली.