शेतकरी कर्ज माफी हा ऐतिहासिक क्षण : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:22 PM2017-10-18T18:22:08+5:302017-10-18T18:27:16+5:30
कोकणातील शेतकरी हा कर्ज कमी घेतो, पण घेतलेले कर्ज वेळेवर फेडतो. शासनाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली. आज दिपावलीच्या पहिल्या दिवशी हा समारंभ होत आहे. शेतकरी कर्ज माफी हा ऐतिहासिक क्षण असे उद्गागार पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे काढले.
सिंधुदुर्गनगरी दि. 18 : कोकणातील शेतकरी हा कर्ज कमी घेतो, पण घेतलेले कर्ज वेळेवर फेडतो. शासनाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली. आज दिपावलीच्या पहिल्या दिवशी हा समारंभ होत आहे. शेतकरी कर्ज माफी हा ऐतिहासिक क्षण असे उद्गागार पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे काढले.
जुन्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी लाभांर्थीना पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांचे कर्ज मुक्तीबाबत प्रमाणपत्र व साडी-चोळी, पॅन्टपीस-शर्टपीस तसेच श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हा उपनिबंधक डॉ. मेधा वाके, उप विभागीय अधिकारी निता शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक अनिरुद्ध देसाई मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पंचविस शेतकरी जोडप्यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा बँकेने खावटी कर्ज वितरणात सवलत मिळावी, दसऱ्यानंतर जिल्ह्यात झालेला पाऊस व त्यामुळे भातशेतीचे झालेले नुकसान याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात आधुनिक भात गिरणीची सुरुवात झाली आहे. भाताला हमी भावापेक्षा 10 टक्के जादा दर देऊन या गिरणीमार्फत भात खरेदी केली जाणार आहे. याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तथापि शेतकऱ्यांनी भाताचे उत्पादन वाढविण्यावर भर दयायला हवा.
शेतीचे यांत्रिकीकरण होऊन विशेषत: महिला वर्गाचे शेतीतील कष्ट कमी व्हावेत या दृष्टीकोनातून चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला असून या योजनेपायी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करुन शेवटी दिपावलीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
जिल्हा बँकेचे अघ्यक्ष सतिश सावंत यावेळी म्हणाले की, जिल्हा बँकेच्या 64 शाखा व विकास संस्थेच्या 226 शाखातील जिल्हा बँकेच्या 21 हजार 172 सभासदांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ होत आहे. या बद्धल शासनाचे आभार व अभिनंदन करतो. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं.
जिल्ह्यात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकरी लाभांर्थीची संख्या मोठया प्रमाणावर आहे. प्रोत्सहानपर अनुदान हे अत्यंत कमी आहे या अनुदानात वाढ व्हावी, रंगनाथन समितीने जाहिर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
आमदार वैभव नाईक यांनी कर्ज मुक्ती करताना शेतकऱ्यांचा सन्मान केला याबद्धल शासनाचे अभिनंदन करुन ते म्हणाले शेती मालाला हमी भाव मिळण्याची नितांत गरज आहे. यंदा अवेळी झालेल्या पाऊसामुळे ओला दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती पालकमंत्री महोदयांनी शासनाकडे मांडावी.
प्रांरभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन जिल्हा उपनिबंधक डॉ. मेधा वाके यांनी प्रास्ताविक केले. शेवटी धुळप यांनी आभार मानले. सुत्रसंचालन शरद सावंत यांनी केले.