शेतकरी खुशीत तर कारखानदार चिंतेत
By admin | Published: March 18, 2017 09:02 PM2017-03-18T21:02:44+5:302017-03-18T21:02:44+5:30
योग्य दर मिळेना : काजूची आवक स्थिर; खर्च-उत्पादनाचा बसेना मेळ
कडावल : काजू उत्पादन यंदा कमी असले तरी स्थानिक बाजारपेठेत काजूला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे; पण कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि तुलनेत काजूगराला अपेक्षित दर मिळत नसल्याने काजू कारखानदारांसमोर संकट उभे राहिले आहे. यामुळेच गतसाली ऐन हंगामात बंद पडलेल्या कारखान्यांच्या विचाराने काजू कारखानदार धास्तावले आहेत.
बाजारपेठेत काजूची आवक काहीशी स्थिर असून, आसपासच्या खेड्यातील शेतकरी आपल्याकडील काजू विक्रीसाठी आणत आहेत. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच काजूला प्रतिकिलो १६० ते १७० रुपयांच्या दरम्यान चांगला बाजारभाव मिळत आहे. काजूची आवक स्थिर असली तरी आणखी काही दिवसानंतर ती वाढेल, असा विश्वास व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
काजूला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी खुशीत असले, तरी काजू कारखानदार मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. काजूची खरेदी करण्यासाठी त्यांना अधिक प्रमाणात खर्च करावा लागत आहे. तसेच मजुरी, पॅकिंग व वाहतूक इत्यादींसाठीही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यामुळे काजूगर उत्पादनासाठी येणारा खर्च व उत्पादनाला मिळणारा दर यात बरीच तफावत येते. या समस्येमुळेच गेल्या वर्षी अनेक लहान-मोठे काजू कारखाने बंद ठेवावे लागले होते. या गोष्टीची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने येथील काजू कारखानदार धास्तावले आहेत.
जिल्ह्यातील अनेक तरुणांनी बँकेचे कर्ज काढून काजू कारखाने सुरू केले आहेत. या उद्योगापासून रोजगार निर्मितीलाही चालना मिळत आहे. मात्र, या उद्योगाचा कच्चा माल म्हणजे काजू बीच्या किमती वाढल्यामुळे काजू कारखानदारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. काजू बी तयार करून तो बाजारात आणण्यासाठी त्यावरील प्रक्रियेचा खर्च पाहता बाजारपेठेत तयार काजू बीला आवश्यक दर मिळत नाही. त्यामुळे कारखानदारांची कोंडी होत असून, सर्व कारखान्यांसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कारखाने कसे सुरू ठेवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. (वार्ताहर)
एक किलो चांगल्या प्रतीचा गर मिळण्यासाठी चार किलो काजू फोडावी लागते. आज काजू किमान १६० रुपये प्रतिकिलो असून, त्याच्या प्रक्रियेसाठी मजुरी, पँकिंग, वाहतूक व इतर खर्चाचा विचार करता बाजारात काजूगराला मिळणारा दर परवडत नाही.
- बाळकृष्ण ठाकूर,
काजू कारखानदार, कडावल