म्हणून पालकमंत्र्यांसमोरच शेतकरी ढसाढसा रडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:42 AM2018-08-13T00:42:18+5:302018-08-13T00:43:14+5:30
महसूल खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त शेतकऱ्याने पालकमंत्र्यांच्या पुढ्यातच महसूलच्या कारभारावर आक्रोश व्यक्त केला.
सावंतवाडी - सामाईक जमिनीत कोणत्याही प्रकारचा फेरफार व रजिस्टार उतारा नसताना महसूल विभागाने २४ एकरमध्ये नोंद घातल्याने नेतर्डेतील स्थानिक शेतकरी जगदेव गवस यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत आपला संताप व्यक्त करत त्याच्या समोरच ढसाढसा रडतच सिंधुदुर्गातील पहिल्या शेतक-याची आत्महत्या सावंतवाडीत होईल आणि याला सर्वस्वी जबाबदार महसूल खाते असेल, असे सांगितले. याबाबतची गंभीर दखल घेत हा विषय तातडीने मार्गी लावा, अशी सूचना पालकमंत्री केसरकर यांनी तहसीलदार सतीश कदम यांना केली.
नेतर्डे येथे सामाईक जमीन आहे. या जमिनीतील २४ एकर जमीन कोणत्याही प्रकारचा फेरफार उतारा नसताना तसेच रजिस्टारकडे नोंद नसताना नावावर चढविण्यात आली. याबाबत वेळोवेळी महसूल विभागाकडे दाद मागितली, तर प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा दुसºयाकडे बोट दाखवतो. तहसीलदार सतीश कदम तर उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, असे म्हणत जगदेव गवस यांनी मंत्री दीपक केसरकर यांची येथील नव्या एचआरडी सेंटरला भेट घेतली आणि आपली कैफियत मांडली. मी प्रत्येक वेळी तहसीलदारांकडे येतो, पण ते कोणत्याही प्रकारची दाद देत नाहीत. महसूलने सगळा घोळ घालून ठेवला आहे. त्यामुळे मी आता काय करू, असा सवाल मंत्री केसरकर यांना केला. यावेळी मंत्री केसरकर यांनी मी बघतो असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, पण जगदेव गवस यांनी मला न्याय मिळाला नाही तर यापुढे गप्प बसणार नाही. सिंधुदुर्गमधील पहिली शेतकरी आत्महत्या सावंतवाडीत होईल, असा इशारा मंत्री केसरकर यांना दिला आहे.
यावेळी गवस यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पालकमंत्र्यांच्या पुढ्यातच महसूलच्या कारभारावर आक्रोश व्यक्त करत मला प्रत्येकजण डावलतात, असे सांगितले. यावेळी समोरच असलेल्या तहसीलदार कदम यान्ाां मंत्री केसरकर यांनी तुम्ही हा विषय लवकर मार्गी लावा, आम्हाला हा विषय संपवायचा आहे, असे सांगितले. तसेच याबाबत मी ही बैठक घेईन, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले. त्यानंतर जगदेव गवस हे शांत झाले.