बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Published: January 3, 2017 11:20 PM2017-01-03T23:20:33+5:302017-01-03T23:20:33+5:30
उधळे जंगलातील घटना : निर्जन ठिकाणी केला घात
खेड : जनावराचा चारा आणण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३५ वाजता घडली. आनंद महादेव पवार (वय ५४, उधळे-बौद्धवाडी, ता. खेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. निर्जन ठिकाणी ते एकटेच सापडल्याने बिबट्याने त्यांना लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही घटना समजण्यातही बराच विलंब झाला.
करटेल आणि शिरवली गावच्या जंगलाची हद्द येथूनच सुरू होते. आनंद पवार आपल्या पाळीव जनावरांसाठी चारा आणण्यासाठी सायंकाळी ५ वाजता जंगलात गेले होते. चारा कापून आणेपर्यंत त्यांना दीड तास लागला. सायंकाळी ६.३० वाजता तेथून गवत घेऊन घरी परतत असताना अंधार होत आला होता. याच अंधारात मागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्याने ते पुरते घाबरुन गेले. त्याच अवस्थेत पवार यांनी बिबट्याशी दोन हात केले. बिबट्याने त्यांचे पोट, दोन्ही पाय, तसेच पाठ आणि मानेच्या बाजूला पुरते फाडले. ही घटना ७.३० वाजता गावकऱ्यांना समजल्यानंतर गावकरी व पवार यांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वन अधिकारी मोहिते आणि पोलिसांना कळविल्यानंतर तेही रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. मात्र, अंधार असल्याने पंचनामा करताना अनेक त्रुटी राहून गेल्या होत्या.
पवार यांचे शव तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी उधळे बौद्धवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळे आनंद पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य देण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल, अशी माहिती वनपाल मोहिते यांनी दिली आहे. त्यातून पवार यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत मिळू शकेल. ही घटना दुर्दैवी असून, बिबट्याच्या शोधासाठी हा परिसर पिंजून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)