टर्मिनसमुळे शेतकऱ्यांचा विकास

By admin | Published: August 12, 2016 12:15 AM2016-08-12T00:15:35+5:302016-08-12T00:18:48+5:30

पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण : रोजगार निर्मितीच्या कक्षा रुंदावल्या; पर्यटन व्यवसायाला गती

Farmers Development due to Terminus | टर्मिनसमुळे शेतकऱ्यांचा विकास

टर्मिनसमुळे शेतकऱ्यांचा विकास

Next

रामचंद्र कुडाळकर -- तळवडे --बरेच वादविवाद, राजकीय हेव्यादाव्यांतून सिंधुदुर्गचे सुपुत्र केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सकारात्मकतेने मळगाव टर्मिनसचे काम गतीस लागल्याने तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला गती मिळाली आहेच; पण त्याचबरोबर आता मळगाव टर्मिनसमुळे शेतकरी आंबा, काजू बागायतदारांच्या प्रगतीचे कवाड खुले झाले आहे. तसेच सर्वसामान्यांना रोजगार निर्मिती आणि त्यातून आर्थिक विकासाचा मार्गही यामुळे खुला झाल्याने मळगाव टर्मिनसचे महत्त्व वाढत आहे.
सावंतवाडीतील बहुचर्चित मळगाव टर्मिनसचा वाद अनेक कारणांनी टोकाला गेला होता. यामध्ये राजकीय टोलेबाजीने हे काम रेंगाळणार की काय? अशी साशंकता वाटत असतानाच गेल्यावर्षी २७ जून २०१५ ला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत या टर्मिनसचे भूमिपूजन झाले. वर्षभरातच यावर्षी सावंतवाडी टर्मिनस फेस-१ चे काम पूर्ण झाले व १९ जून २०१६ ला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गोवा येथून रिमोट कंट्रोलद्वारे उद्घाटन केले. या टर्मिनसच्या फे स- १ साठी ११ कोटी ४२ लाख रुपये खर्च आला आहे. तसेच याच टर्मिनसच्या फेस-२ साठी ८ क ोटी १५ लाख रुपयांचा निधी लागणार असून, त्यालाही केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली आहे.
टर्मिनसच्या कामामुळे सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या सर्वांगीण विकासाचे पाऊल उचलले असून, कोकणवासीयांना याचा चांगला फायदा होणार आहे. ज्या कोकण रेल्वेच्या विकासासाकडे पूर्वी दुर्लक्ष करण्यात आले होते, त्या कोकण रेल्वेला सोन्याचे दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या टर्मिनसबरोबर नवीन प्लॅटफॉर्म, तिकीट खिडकी अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच टर्मिनसच्या ठिकाणी प्रवाशांना वेटिंगरूम, सर्क्युलेशन, एरिया स्टेशनमास्तर कक्ष तसेच विविध सुविधा वाढविण्यात येणार आहेत. रत्नागिरी जंक्शनप्रमाणे सावंतवाडी टर्मिनसवर सुविधा देण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सर्व सुखसोयी कोकण रेल्वेमार्फत पुरविण्यात येणार आहेत.
टर्मिनसचे दोन्ही टप्प्यांचे काम पूर्णत्वास आल्यावर मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, मडगाव-एल.टी.डी डबलडेकर एक्स्प्रेस, गांधीधाम नागरकोईल एक्स्प्रेस, त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेस, वास्को-पटना एक्स्प्रेस, पुणे-एर्नाकुलम एक्स्पे्रस, मडगाव-रत्नागिरी यात्री गाडी, दादर राज्यराणी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी, मडगाव-सावंतवाडी या गाड्यांना सावंतवाडी टर्मिनसचे सर्व काम परिपूर्ण झाल्यावर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवनव्या बाजारपेठा आवाक्यात येणार असून प्रवाशांचा लांबचा प्रवासही सुलभ होणार आहे.

Web Title: Farmers Development due to Terminus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.