जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 06:13 PM2021-07-05T18:13:30+5:302021-07-05T18:15:08+5:30
Rain AgricultureSector Sindhudurg : कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाने आता अचानक विश्रांती घेतली आहे. गेले तीन दिवस कडक ऊन पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. यापुढील कालावधीत कडक ऊन असेच पडल्यास भातशेती सुकून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कणकवली : कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाने आता अचानक विश्रांती घेतली आहे. गेले तीन दिवस कडक ऊन पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. यापुढील कालावधीत कडक ऊन असेच पडल्यास भातशेती सुकून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या मध्यांतरात तौक्ते चक्रीवादळ आल्याने, त्या कालावधीतच मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी भेडसावणारी पाण्याची समस्या मात्र दूर झाली, तर शेत जमीन ओलीचिंब झाल्याने शेतकरीही सुखावला होता. त्यानंतर, पावसाचा ओघ कायमच राहिल्याने, अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्यातच नांगरणीला सुरुवात केली होती.
दरवर्षी ही नांगरणी जूनच्या मध्यानंतर केली जाते. मात्र, पुरेशा पडलेल्या या पावसाने यावर्षी सारे काही चित्रच बदलून टाकले. त्यानंतर, शेती कामांना वेग येत पेरणी करून आता भात वाण लावणी योग्य झाले आहे.
मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभरात पावसाची तुरळक सर कोसळत असली, तरी तिचा भात शेतीसाठी उपयोग नाही. त्यामुळे मोठा पाऊस येणार की नाही, या चिंतेत शेतकरी पडला आहे. अधूनमधून काळे ढग येऊन पावसाचे चिन्ह निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत आहेत.
शेतकरी मोठ्या अडचणीत
जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या भाताचा कालावधी पूर्ण झाल्याने आता ते लावणीयोग्य झाले आहे. मात्र, पाऊस येण्याची चिन्हेच नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पाऊस नसल्याने उंच भागातील जमिनीतील पाणी सुकून गेले आहे, तर गेल्या २ ते ४ दिवसांत लावणी केलेले भात पाऊस न पडल्यास सुकण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्याचे डोळे नभाकडे लागून राहिले आहेत, तर काही भागांत शेती वाळून जाऊ नये, यासाठी कृत्रिम पाण्याचा उसपा करून शेतीला पाणी पुरविले जात आहे. भरडी शेती असलेले शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.