शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका

By admin | Published: May 5, 2015 12:46 AM2015-05-05T00:46:35+5:302015-05-05T00:48:48+5:30

विनोद तावडे : कोकणी माणसाने संकटामुळे निराश होऊ नये; सरकार पाठीशी

Farmers, do not commit suicide | शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका

Next

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, असे असले तरी नैराश्येमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. कोकणी माणसाने संकटामुळे निराश होऊ नये, आपण त्यावर मार्ग काढू. शासन केव्हाही शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील आंबा बागायतदाराने रविवारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, या पार्श्वभूमीवर तावडे येथे पत्रकारांशी बोलत होते. आंबा बागायतदाराच्या आत्महत्येबद्दल खंत व्यक्त करून तावडे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार ठामपणे उभं आहे आणि राहील, अशी ग्वाही दिली. राज्य शासनातर्फे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर अधिक भर दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पटपडताळणीमध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे सांगत तावडे यांनी यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले.
पवारांना आताच कळवळा का?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र शासन शेतकरी हिताविरोधी असल्याची टीका केली आहे. पवारांना विरोधी पक्षात बसल्यावर शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. हा कळवळा जर १५ वर्षांपूर्वी पवारांनी दाखविला असता, तर शेतकऱ्यांवर आजची वेळ आली नसती, अशी टीकाही तावडे यांनी केली.
आधी सुलटी...नंतर पलटी...
मेरिटाईम बोर्डाचे उपकेंद्र रायगड किंवा सिंधुदुर्गमध्ये होणे आवश्यक असल्याचे तावडे यांनी भाषणात सांगितले. मात्र, पत्रकारांशी बोलताना ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीत उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.
कोणतेही पुरस्कार वादापलीकडे हवेत
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना तावडे म्हणाले की, कोणताही पुरस्कार हा वादापलीकडे असला पाहिजे. त्या-त्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहूनच तो दिला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं, ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे.

Web Title: Farmers, do not commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.