हत्ती प्रश्नावरून दोडामार्गमधील शेतकरी आक्रमक; पोलिस-शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
By अनंत खं.जाधव | Published: August 10, 2023 06:31 PM2023-08-10T18:31:00+5:302023-08-10T18:31:19+5:30
अखेर मंत्री केसरकर यांच्याकडून मध्यस्थी
सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यात बागायतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला अधिकार द्या, अशी संतप्त मागणी करत गुरूवारी सावंतवाडीत आलेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे म्हणत वनविभाग कार्यालया समोर ठिय्या मांडला.
अखेर सायंकाळी मंत्री दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून बैठक लावण्याचे आश्वासन घेत तसे लेखी पत्र उपवनसंरक्षक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दोडामार्ग तालुक्यातील तब्बल दहा गावच्या ग्रामस्थांनी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे म्हणत सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथील वनविभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी वनविभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपवनसंरक्षक एस.एन. रेड्डी यांनी ग्रामस्थांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते.
गेली २२ वर्षे हत्तींचा प्रश्न कायम आहे. आमच्या शेती बागायतींचे नुकसान होत आहे. नुकसान भरपाई ही तुटपुंजी आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आश्वासने नको, हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा, तुम्हाला जमत नसेल तर आमचे संरक्षण आम्ही करू, अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले होते. त्यातच पोलिस आणि शेतकरी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. अखेर पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांनी मध्यस्थी करत यावेळी शेतकऱ्यांना शांत केले.
माजी आमदार राजन तेली यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी शिंदे गटाचे पदाधिकारी ही तेथे आले आणि आपल्या दोघांनाही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यातच राजू निंबाळकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला. मंत्री केसरकर यांनी येत्या पंधरा दिवसांत बैठक लावली जाणार असून हत्ती हटाव मोहीम राबविण्यासाठी आसाम येथील पथक दोडामार्ग येथे येईल असे आश्वासन दिले व तसे पत्र उपवनसंरक्षक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, निता कविटकर, एकनाथ नाडकर्णी, प्रमोनंद देसाई, सुधीर दळवी, पंकज गवस, विष्णू देसाई, रामकृष्ण मिरीकर, आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.
वनविभागाला पोलिस छावणीचे स्वरूप
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वनविभागाला छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तर सायंकाळी राज्य राखीव पोलिस दलाची कुमक बोलविण्यात आली होती.