हत्तींच्या पाठलागात शेतकरी जखमी

By admin | Published: May 12, 2017 10:49 PM2017-05-12T22:49:31+5:302017-05-12T22:49:31+5:30

हत्तींच्या पाठलागात शेतकरी जखमी

Farmers injured in elephant chase | हत्तींच्या पाठलागात शेतकरी जखमी

हत्तींच्या पाठलागात शेतकरी जखमी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
दोडामार्ग : जंगली हत्तींनी पाठलाग केल्याने त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी पळताना खाली पडल्याने बाबरवाडीतील शेतकरी चंद्रकांत लक्ष्मण गवस (वय ६४) हे गंभीर जखमी झाले. त्यांना साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
केवळ दैव बलवत्तर म्हणून हत्तींच्या हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले. दरम्यान, या घटनेची माहिती हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई यांनी वनविभागाला दिल्यावर सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक व दोडामार्गचे वनक्षेत्रपाल सचिन आठवले हेवाळेकडे रवाना झाले होते.
सध्या तिलारी खोऱ्यात हत्तींच्या दोन कळपांचा वावर सुरू आहे. पूर्वी या भागात चार हत्तींचा कळप होता. मात्र, आता त्यात नव्याने आणखीन सात हत्तींच्या कळपाची भर पडली आहे. दोन दिवसांपासून हा कळप बोरयेवाडी व ठाकूरवाडीत नुकसान करीत आहे. बुधवारी व गुरुवारी रात्री तेथील महादेव ठाकूर व राजाराम ठाकूर यांच्या बागायतीत हत्तींनी घुसून नारळ, केळी व पोफळीच्या झाडांचे अतोनात नुकसान केले होते. याच माडाच्या झाडांची झावळे आणण्यासाठी चंद्रकांत गवस हे बागेत गेले होते. यादरम्यान अडगळीत असलेल्या हत्तींच्या कळपातील एका हत्तीने गवस यांच्यावर चाल केली. समोर हत्तीला बघून गवस यांची बोबडीच वळली. हत्ती त्यांचा पाठलाग करीत गवस यांच्या पाठिमागे लागला. त्याच्यापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी चंद्रकांत गवस जीवाच्या आकांताने आरडाओरड करीत धावू लागले. मात्र, ठेच लागून खाली पडल्याने ते गंभीर जखमी झाले. तोपर्यंत गवस यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ त्याठिकाणी पोहोचले होते. त्यांनी गवस यांचा पाठलाग करणाऱ्या हत्तीला जंगलात पिटाळून लावले. पुढ्यात साक्षात मृत्यू उभा असताना केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ते हत्तीच्या हल्ल्यातून बचावले. त्यांना साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेवाळे सरपंचांकडून आमरण उपोषणाचा इशारा
हेवाळेत हत्ती बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची ग्वाही वनविभागाने देऊन सुध्दा ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वनविभागाच्या विरोधात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सरपंच संदीप देसाई यांनी दिला आहे.

Web Title: Farmers injured in elephant chase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.