शेतकऱ्यांनी शाश्वत काजू उत्पादन घ्यावे
By admin | Published: March 10, 2017 10:07 PM2017-03-10T22:07:24+5:302017-03-10T22:07:24+5:30
दीनानाथ वेर्णेकर : वेंगुर्लेत काजू उत्पादकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
वेंगुर्ले : काजू उत्पादन आणि प्रक्रिया या प्रशिक्षणाचा उपयोग करून काजू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी फक्त उत्पादनावर समाधान न मानता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत काजू पीक उत्पादन घ्यावे व त्यावर प्रक्रिया करून जास्तीत जास्त नफा मिळवावा, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे सचिव दीनानाथ वेर्णेकर यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग, काजू आणि कोको विकास संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दर्याराजा रिसॉर्ट येथे ‘काजू उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञान’ या विषयावर शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन दीनानाथ वेर्णेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कीटकशास्त्रज्ञ प्रा. बाळकृष्ण गावडे, मृदशास्त्रज्ञ प्रा. विकास धामापुरकर, कृषी अधिकारी एस. व्ही. राऊळ, आदी, मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रा. विकास धामापुरकर यांनी जमीन सुपीकता व्यवस्थापन व काजूमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करून उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, तसेच काजू पिक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्र्रव्य पद्धत, गुणात्मक कार्य, माती परीक्षणावरून काजू पिकामध्ये व्यवस्थापन, काजू पिकांचे सिंधुदुर्ग कृषी विकासामध्ये योगदान याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
प्रा. बाळकृष्ण गावडे यांनी सिंधुदुर्गातील काजू पिकात आढळणारी मुख्य कीड व रोगांची लक्षणे त्यासंबंधीच्या उपाययोजना, शाश्वत काजू पीक उत्पादनात कीटकनाशकांचा उपयोग, गुणात्मक व दर्जेदार उत्पादनासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
तंत्रज्ञान अवघत करा
काजू उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञानविषयी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विकास प्रतिष्ठानमार्फत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळे काजू प्रकल्प, तसेच काजू शेतकऱ्यांना कृषी महोत्सवाची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी महोत्सवात सहभागी होऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहन वेर्णेकर यांनी केले.