पावसाने शेतकरी, व्यापारी त्रस्त
By admin | Published: May 19, 2015 10:40 PM2015-05-19T22:40:56+5:302015-05-21T00:11:14+5:30
उलाढाल मंदावली : आंब्यांचे नुकसान वाढले; किरकोळ भाज्यांवरच समाधान
प्रसन्न राणे - सावंतवाड तालुक्यात सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सत्र थांबता थांबत नाही. यामुळे शहरातील बाजारात मोठ्या प्रमाणावर होत असेलली फळे, भाज्या तसेच अन्य पदार्थांची उलाढाल मंद गतीने होताना दिसत आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांना दररोज नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
उन्हाळ््यामध्येच पावसाने धरलेला जोर शेतकऱ्यांसाठी नुुकसानीचा ठरला होता. मात्र, त्यातून सावरत असताना पावसाने जोर कायम ठेवला. यामुळे शेतकरी वर्ग, त्यावर अवलंबून असणारा व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत आला होता. काही दिवसांनंतर पुन्हा अवकाळी पावसाने जोर धरत आजपर्यंत अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांची पूर्णत: नासधूस केली आहे. यामुळे शेवटच्या पिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र थांबता थांबत नाही. तालुक्यात उन्हाळ््यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उलाढाल होते ती म्हणजे आंबा, काजू या पिकांची. मात्र, या फळांना पावसाने सुरुवातीपासूनच घेरल्याने त्यावर अवलंबून असणारे शेतकरी व व्यापारी अडचणीत आले आहेत. त्यातून सावरत असताना अवकाळी पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.
अवकाळी पावसाने बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात मंदी आलेली दिसून येत आहे. शेतकरी पूर्णत: अडचणीत असल्याने पूर्वीप्रमाणे बाजारपेठ फुलून दिसत नाही. बारीकसारीक भाज्यांची विक्री करून शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे.
पावसाळ््याआधीच नैसर्गिक आपत्ती
अवकाळी पावसाचे सत्र गेले चार महिने थांबतच नसल्याने काजू, आंबा या पिकांनंतर फळभाज्यांनाही त्रासदायक ठरत असल्याचे दिसत आहे.
गेले आठ दिवस पुन्हा अवकाळी पावसाने आपला जोर कायम केला असल्याने फळभाज्यांची विक्रीही कमी होताना दिसत आहे.
यातच गावातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. चौकुळ, आंबोली, सावंंतवाडी, बांदा, कोलगाव, डिंगणे, इन्सुली या भागात मोठ्या प्रमाणात वादळी पावसाचा फटका बसल्याने नैसर्गिक आपत्तींनाही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील अनेक भागांचे पंचनामे सुरू आहेत.
आंब्याचा दर २00 रूपयांपर्यंत घसरला
पूर्वी मे महिन्यात सावंतवाडी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबे, फणसांची उलाढाल होताना दिसत होती. मात्र, आता अवकाळी पावसामुळे क्वचितच व्यापारी आंबे विक्री करताना दिसत आहेत. तेही अत्यंत कवडीमोल किमतीने.
व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. ८०० ते १००० रुपये प्रतिकिलो आंब्याचा दर आता २०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या अडचणीत आले आहेत.