गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, जखमीवर बांबुळीत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 04:04 PM2019-09-10T16:04:14+5:302019-09-10T16:06:15+5:30
उपवडे-देऊळवाडी येथील सुभाष यशवंत शेडगे (६०) या शेतकऱ्यावर गव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेडगे यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास शेडगे यांच्या घरालगत असलेल्या रबर प्लँटेशननजीक घडली. या घटनेने उपवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
माणगांव : उपवडे-देऊळवाडी येथील सुभाष यशवंत शेडगे (६०) या शेतकऱ्यावर गव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेडगे यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास शेडगे यांच्या घरालगत असलेल्या रबर प्लँटेशननजीक घडली. या घटनेने उपवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुडाळ तालुक्यात माणगांव खोऱ्यातील उपवडे-देऊळवाडी येथे सुभाष शेडगे यांचे घर आहे. घराच्या सभोवताली जंगलमय भाग असल्याने जंगली प्राण्यांचा वावर नित्याचाच असतो. रविवारी रात्री सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करून शेडगे कुटुंबातील मंडळी घरी आली.
या दरम्यान कुत्रे भुंकू लागल्याने शेडगे लगत असलेल्या भातशेती व रबर प्लँटेशनच्या दिशेने गेले. यावेळी अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेडगे गंभीर जखमी झाले. आरडाओरड करीत त्याच स्थितीत त्यांनी कसेबसे घर गाठले. रक्ताने माखलेल्या शेडगे यांना स्थानिक ग्रामस्थांनी धावपळ करीत माणगांव आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथून सावंतवाडी रुग्णालयात व त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोवा-बांबोळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरु केले. शेडगे यांच्या डाव्या बाजूकडील छातीच्या बरगड्या मोडल्या असून हातालासुध्दा गंभीर दुखापत झाली आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच उपवडे वनपाल हरी लाड, पोलीस पाटील जिजानंद शेडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, शेडगे कुटुंबीयांपैकी घरी कुणी नसल्याने निश्चित घटनास्थळ समजू शकले नाही. कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीशी संपर्क साधला असून, मंगळवारी घटनास्थळी पंचनाम्याकरिता वनविभागाचे कर्मचारी जाणार आहेत. गोवा-बांबोळी येथे सुद्धा भेट देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.