मुसळधार पावसाने शेतकरी धास्तावले

By admin | Published: June 12, 2016 09:27 PM2016-06-12T21:27:52+5:302016-06-13T00:17:57+5:30

बियाणे कुजण्याची भीती : दुबार पेरणीचे संकट

Farmers were afraid of heavy rains | मुसळधार पावसाने शेतकरी धास्तावले

मुसळधार पावसाने शेतकरी धास्तावले

Next

कडावल : परिसरात भात पेरणीची कामे प्रगतिपथावर असली तरी पावसाच्या पाण्यामुळे नुकताच फुटलेला कोवळा अंकुर कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. महागडे बियाणेही कुजून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास सर्व खर्च वाया जाणार असून, दुबार पेरणीच्या संकटाच्या धास्तीने येथील शेतकरी धास्तावले आहेत.
साधारणत: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वळवाचा पाऊस पडेल असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र, पर्जन्यराजाने हा अंदाज खोटा ठरविला. प्रत्यक्षात जून महिना आला तरीही वळवाचा पाऊस पडलाच नाही. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस पडला. तेव्हा उन्हाळी पिकांच्या लागवडी खाली असलेली जमीन हलकी झाल्यामुळे अशा जमिनीवर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात भात पेरणी केली. उर्वरित शेतकरी शिवार मऊशार होण्यासाठी अधिक पावसाच्या प्रतीक्षेत होते.
त्यानंतर मात्र नियमित पाऊस पडू लागला आणि शेतजमीन नरम झाल्यामुळे भात पेरणीच्या कामाला गती मिळाली. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाले. सध्या पेरणीची कामे प्रगतिपथावर असून, अंतिम टप्प्यात आली आहेत. परिसरात काही शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे पूर्ण केली आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांची भात पेरणी पूर्णत्वाकडे आली आहे. येत्या दोन-चार दिवसांमध्येच खरीप भात पेरणी हंगामाची सांगता होण्याची शक्यता आहे.परिसरात भात पेरणीचे काम प्रगतिपथावर असले तरी रोज पडणाऱ्या पावसामुळे भात पेरणी संकटात आली आहे. सुरुवातीला पेरणी झालेल्या भात बियाण्याला आता अंकुर फुटला आहे. पावसाचे पाणी वाफ्यात साचत असल्याने हा कोवळा अंकुर कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच भात बियाणेही कुजण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास महागड्या बियाण्यांसाठी तसेच शेत नांगरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला सर्व खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, दुबार पेरणीच्या संकटाच्या भयाने शेतकरी धास्तावले आहेत. (वार्ताहर)

पेरणीसाठी सुधारित वाणांचा वापर
यंदा वळवाचा पाऊस योग्य प्रमाणात न पडल्यामुळे भात पेरणीची कामे खोळंबून राहिली होती. आता पुरेसा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी भात पेरणीस प्रारंभ केला आहे. पेरणीच्या कामात शेतकरी व्यस्त झाले आहेत.
पेरणीसाठी पारंपरिक वाणांबरोबरच आधुनिक संकरित व सुधारित वाणांचा वापर करण्यात येत आहे. काम जलद व्हावे यासाठी पारंपरिक जोतांबरोबर पावर ट्रेलरचा वापर करण्यात येत आहे.

Web Title: Farmers were afraid of heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.