नुकसानीमुळे शेतकरी हवालदील

By admin | Published: March 15, 2015 09:41 PM2015-03-15T21:41:37+5:302015-03-16T00:16:50+5:30

जिल्ह्यातील स्थिती : अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानामुळे बळीराजा संकटात

The farmers will be hit due to the loss | नुकसानीमुळे शेतकरी हवालदील

नुकसानीमुळे शेतकरी हवालदील

Next

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग -कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काजू व आंबा या दोन्ही पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. तालुक्यात काजू या पिकावरच अर्थव्यवस्था असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शासनाने नुकसान भरपाई दिल्यास शेतकरी तरणार आहे.
कोकणपट्ट्यात हवामान उष्ण असल्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यामुळे कोकणातील खास करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सुखाने जगू शकतो. या पिकांवरच येथील शेतकऱ्यांचे भवितव्य अलवंबून आहे. या पिकांवरच शेतकरी आपले कुटुंब चालवू शकतो. मात्र, हवामानात वारंवार होणाऱ्या बदलामुळे या पिकांना फटका बसत आहे. त्यात अवकाळी पावसाने तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडून टाकले आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळे प्रमुख पिकांना फटका बसला. हवामानात सातत्याने दमटपणा असल्याने मिळणारे काजू पीक आता मिळणार नाही. काजू झाडांवरील मोहोर पूर्णपणे करपून गेला असून काजू पीक गळू लागले आहे. बोंडूही वाळू लागले आहेत. पीकधारणा बंद झाली आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळाली, तरच शेतकरी तरू शकणार आहे.

काजू, आंबा पिक उत्पादनात घट होणार

हजारो कुटुंबे रोजगारापासून वंचित
अवकाळी पावसामुळे काजू पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. हजारो कुटुुंबे रोजगारापासून वंचित राहणार असून उपासमारीचीही वेळ येणार आहे. काजू पिकावरच काजू युनिट उद्योग अवलंबून आहे. काजूचे उत्पादन घटणार आहे. प्रथमच असे संकट आल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक सहकार्य करणे आवश्यक आहे.
- चंद्रशेखर देसाई,
उद्योजक, दोडामार्ग


उत्पादनातील घट व्यावसायिकांना मारक
काजू पिकावर अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात संकट आले आहे. काजू पिकावरच आमचा उदरनिर्वाह चालतो. अवकाळी पावसाळीमुळे थोड्याफार प्रमाणात नुकसान होणार होते. मात्र, हवामानात दमटपणा असल्याने पाण्याचे थेंब आंबा, काजूच्या मोहोरावर चिकटून राहत असल्याने किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
- शिला पाटयेकर,
काजू व्यावसायिक

Web Title: The farmers will be hit due to the loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.