तिसऱ्या दिवशीही दोडामार्गमधील उपोषण चालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:51 PM2020-09-26T17:51:15+5:302020-09-26T18:00:35+5:30
वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनासाठी सिद्धेश राणे व संदेश राणे यांनी छेडलेले उपोषण तिसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेदखल झाले. अवैध्य वृक्षतोड, वनबंधारे व सौरऊर्जा कुंपणाचे दर्जाहीन काम याबाबत राणे यांनी लक्ष वेधले. कार्यवाही करा अन्यथा उपोषण मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दोडामार्ग : वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनासाठी सिद्धेश राणे व संदेश राणे यांनी छेडलेले उपोषण तिसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेदखल झाले. अवैध्य वृक्षतोड, वनबंधारे व सौरऊर्जा कुंपणाचे दर्जाहीन काम याबाबत राणे यांनी लक्ष वेधले. कार्यवाही करा अन्यथा उपोषण मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दोडामार्ग येथे वनविभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात छेडण्यात आलेल्या उपोषणाला तिसऱ्या दिवशी अँटी करप्शन फौंडेशन आॅफ इंडिया व ह्युमन राईट्स या अशासकीय संस्थेच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला भेट दिली. याप्रकरणी आम्ही वनाविभागाशी याबाबत चर्चा केली आहे.
संबंधित अधिकारी आंदोलन करते दोषी असल्याचे आरोप करत आहेत. जर आंदोलन करते दोषी आहेत. तर त्या अधिकाऱ्यांनी तसे पुरावे देऊन या प्रकरणातील संपूर्ण माहिती जाहीर करावी. अवैध वृक्षतोड झालेली आहे.
सौर कुंपण काम आणि वनबंधारे निकृष्ट दर्जाचे आहे. असे उपोषणकर्त्यांनी मुद्दे मंडले आहेत. याचा पारदर्शक कागदोपत्री पुरावे वनविभागाने सादर करावेत. शासनाकडून २३ कोटी वृक्ष लागवड करण्यात आलेले आहेत.
यांचेही पुराव्यासह स्पष्टीकरण वनविभागाने द्यावे अन्यथा याविरुद्ध आम्ही आवाज उठवू असा इशारा यावेळी राष्ट्रीय अँटी करप्शन फौंडेशन आॅफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक प्रशांत बोर्डेकर व ह्युमन राईट्स इंटरनॅशनल संस्थेच्या उपजिल्हा समन्वयक अश्विनी शिरोडकर यांनी दिला आहे.
वनाविभागातील एक कर्मचारी हा शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी यांच्यावर आर्थिक देवाण घेवाणीचा आरोप करत आहे. त्याचेही पुरावे त्यांनी सादर करावेत अन्यथा उग्रआंदोलन छेडण्याचा इशारा संस्थांकडून देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव व कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांना शुक्रवारी भेट दिली. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी माझ्याकडून शासन स्तरावर सर्व कामाची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करतो असे स्पष्ट केले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, दोडामार्ग तालुका अध्यक्ष महादेव बोर्डेकर, शहराध्यक्ष चांदेलकर, कार्यकर्ते सुदेश तुळसकर, अविनाश गवस, सुशांत राऊत, उल्हास नाईक आदी उपस्थित होते.