जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 08:13 PM2020-03-05T20:13:50+5:302020-03-05T20:15:07+5:30
देवगड तालुक्यातील एका शासकीय वेतन अनुदान घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून २३ वर्षे सेवा बजावूनही अचानक सेवेतून कमी केले आहे. तसेच ही संस्था पुनर्नियुक्ती देण्यासही टाळाटाळ करीत आहे. या अन्यायाविरोधात सोमवारपासून देवगड येथील प्रमोद सोनकुसरे यांनी कुटुंबीयांसमवेत जिल्हाधिकारी दालनासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा सोनकुसरे यांनी दिला आहे.
सिंधुदुर्गनगरी : देवगड तालुक्यातील एका शासकीय वेतन अनुदान घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून २३ वर्षे सेवा बजावूनही अचानक सेवेतून कमी केले आहे. तसेच ही संस्था पुनर्नियुक्ती देण्यासही टाळाटाळ करीत आहे. या अन्यायाविरोधात सोमवारपासून देवगड येथील प्रमोद सोनकुसरे यांनी कुटुंबीयांसमवेत जिल्हाधिकारी दालनासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा सोनकुसरे यांनी दिला आहे.
देवगड तालुक्यातील या संस्थेत आपण २३ वर्षे वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावली आहे. मागील ३ वर्षे आपण विना मोबदला सेवा सुरू ठेवली होती. मात्र, अचानक या संस्थेने आपल्याला सेवेतून कमी केले, असे प्रमोद सोनकुसरे यांनी निवेदनात म्हटले आहे. संस्थेची भूमिका अन्यायकारक आहे. याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, तेथूनही अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचे उपोषणकर्ते सोनकुसरे यांनी सांगितले.
प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अखेर सोमवारपासून प्रमोद सोनकुसरे यांच्यासह कुटुंबीय बेमुदत उपोषणाला बसले आहेत. सेवेतून कमी केल्यामुळे आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची उपासमार होता आहे. हा माझ्यावर अन्याय आहे. तरी शासन निर्णयाचा आधार घेऊन आपल्याला पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी सोनकुसरे यांनी केली आहे.