राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे उपोषण

By admin | Published: February 3, 2015 09:44 PM2015-02-03T21:44:27+5:302015-02-03T23:54:54+5:30

तिलारी वनटाईम सेटलमेंटप्रश्नी प्रकल्पग्रस्त आक्रमक

Fasting of NCP workers | राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे उपोषण

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे उपोषण

Next

दोडामार्ग : तिलारी धरणग्रस्तांच्या वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न तत्काळ मार्गी लागावा, यासाठी मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस यांनी येथील तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह उपोषण केले. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मणेरी येथून तिलारीचे पाणी वेंगुर्लेपर्यंत नेण्यासाठी सुरू असलेल्या पाईपलाईनचे काम बंद ठेवण्यात यावे, अशी आग्रही मागणीदेखील यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या संयुक्त पुढाकारातून साकारलेल्या तिलारी धरणासाठी पाल, पाटये, सरगवे, आयनोडे, केंद्रेखुर्द, बुदु्रक, शिरंगे या गावातील लोकांनी आपल्या जमिनी दिल्या. शासनाने या जमिनी ताब्यात घेताना धरणग्रस्तांना घरटी एक नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रकल्प पूर्ण झाला, तरी त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. या आपल्या प्रमुख मागणीसाठी दोन वर्षांपूर्वी धरणग्रस्तांनी कालव्यातच उतरून ठिय्या आंदोलन करीत गोव्याला जाणारे पाणी अडविले होते. त्या आंदोलनाची दखल घेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी तिलारीत येऊन धरणग्रस्तांशी चर्चा केली होती. यावेळी नोकरीऐवजी धरणग्रस्तांना वनटाईम सेटलमेंट म्हणून एक विशिष्ट रक्कम देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या कंट्रोल बोर्डाची बैठक होऊन वनटाईम सेटलमेंटच्या पर्यायावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु त्यानंतर एक वर्ष झाले, तरी अद्याप धरणग्रस्तांचा प्रश्न सुटलेला नाही.
एका बाजूला तिलारी धरणाच्या धरणग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित आहे, तर दुसरीकडे मात्र ज्या नदीवर धरण उभे आहे, त्या तिलारी नदीचे पाणी मणेरी येथून उपसा करून ते वेंगुर्लेपर्यंत नेण्याची योजना जीवन प्राधिकरण विभागाने आखली आहे. सध्या या योजनेचे काम सुरू असून पाईपलाईन टाकली जात आहे. ही पाईपलाईन टाकत असताना भराव व्यवस्थित होत नसल्याने पावसाळ्यात माती रस्त्यावर येऊन अपघात होण्याची शक्यता दाट शक्यता आहे. त्यामुळे या पाईप लाईनचे काम निर्धोक करण्यात यावेच. परंतु त्यापूर्वी तिलारी धरणग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी गोपाळ गवस यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत ललिता भोळे, माजी तालुकाध्यक्ष महादेव बोर्डेकर, अभिषेक गवस, नंदकिशोर गवस, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेखा कदम, तानाजी भोळे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा न केल्याने धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत गोपाळ गवस यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे उशिरापर्यंत उपोषण सुरू होते. (प्रतिनिधी)

Web Title: Fasting of NCP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.