जिंकू किंवा मरु; उपोषण आजपासून सुरु!, महिलादिनीच वैभववाडीत टपरीधारक महिलांचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 03:30 PM2023-03-08T15:30:22+5:302023-03-08T18:33:30+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा गौरव सुरु असतानाच वैभववाडीत महिलांचा आक्रोश
प्रकाश काळे
वैभववाडी (सिंधुदुर्ग): जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा गौरव सुरु असतानाच वैभववाडीत मात्र टपऱ्या हटवून रोजीरोटी हिरावणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाच्या कारवाईच्या निषेधार्थ महिलादिनी उध्वस्त झालेल्या टपरीधारक महिला आक्रोश करताना दिसल्या. राष्ट्रपुरुष, समाजसुधारकांच्या प्रतिमांसह वैभववाडी शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर या महिलांनी उपोषण सुरु केले आहे. तर बाजूलाच नगरपंचायत प्रशासना विरोधात अपक्ष नगरसेविका अक्षता जैतापकर याही उपोषणाला बसल्या आहेत.
शहरातील 'टपरी हटाव' मोहिमेविरोधात टपरीधारक महिलाचे उपोषण सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शहरात 'टपरी हटाव' मोहिम नगरपंचायतीने राबविली. शहरातील सर्व टपऱ्या हटविल्यामुळे अनेक कुटुंबांचे रोजगार गेले आहेत. प्रशासनाने पुन्हा टपऱ्या लावण्यास परवानगी द्यावी; यासाठी टपरीधारक महिला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशासन रस्त्यावर उतरल्या आहेत. दत्तमंदिर येथून हातात विविध घोषवाक्यांचे फलक घेऊन घोषणा देत मोर्चाने महिला तहसीलसमोर दाखल झाल्या. तेथे त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
त्याचबरोबर अपक्ष नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी नगरपंचायत प्रशासनाविरोधात उपोषण सुरू केले आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे मागणी केलेली कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. तसेच नगरपंचायतीच्या सभांना पत्रकारांना निमंत्रित केले जात नाही. ह्या गोष्टी प्रशासन जाणूनबुजून करत आहे, असा जैतापकर यांचा आरोप आहे. याबाबत संबधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी; अशी मागणी केली आहे. दरम्यान, या दोन्ही उपोषणाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी पाठिंबा दिला आहे.
हाच का महिला सन्मान ?
सकाळी ११ वाजल्यापासून ही दोन्ही उपोषणे सुरु असून टपरीधारक महिलांच्या घोषणांनी तहसीलचा परिसर दणाणून गेला. मात्र याठिकाणी तालुक्यातील एकही जबाबदार अधिकारी उपोषणास बसलेल्या महिलांशी चर्चेसाठी फिरकले नाहीत. हीच का प्रशासनाची महिलांप्रती आदराची भुमिका? हाच का महिलांचा सन्मान? असा सवाल उपोषणकर्त्या महिला करीत आहेत.