अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी उपोषण
By admin | Published: September 1, 2014 09:46 PM2014-09-01T21:46:16+5:302014-09-01T23:57:12+5:30
खुडी माध्यमिक विद्यालय वाद : कोटकामते संस्थाचालक, पालक-शिक्षक आक्रमक
ओरोस : देवगड तालुक्यातील खुडी माध्यमिक विद्यालय ही अनधिकृत शाळा तत्काळ बंद करावी, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी देवगड तालुक्यातील श्री भगवती माध्यमिक विद्यालय कोटकामतेचे संस्थाचालक, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, देवगड तालुक्यात खुडी माध्यमिक विद्यालय ही अनधिकृत शाळा जून २०११ पासून सुरू असून याचा परिणाम आपल्या बृहत योजनेतील मान्यताप्राप्त अनुदानित शाळेवर दिसून येत आहे. कोणतीही शाळा शासन अथवा संबंधित प्राधिकरणाच्या मान्यता तसेच नाहरकत प्रमाणपत्राशिवाय शाळा चालविल्यास १ लाख रूपये दंडाची शिक्षा व त्यानंतरही सुरू ठेवल्यास प्रतिदिन दहा हजार रूपये दंडाची तरतूद अधिनियमात आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याची अंतिम नोटीस देऊन शाळा बंद झालेली नाही. तसेच कार्यालयामार्फत दंडही वसूल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणतीही कारवाई न करता केवळ नोटीसा देण्याचे काम करीत हा विभाग या अनधिकृत शाळेला पाठीशी घालत आहे. या अनधिकृत शाळेमुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्याचा परिणाम भावी काळात शाळेच्या गुणवत्तेवर होणार आहे. त्यामुळे खुडी माध्यमिक विद्यालय ही अनधिकृत शाळा तत्काळ बंद करावी व त्यांच्यावर दंडासह फौजदारी कारवाई करावी. या मागणीसाठी श्री भगवती माध्यमिक विद्यालय कोटकामतेचे संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले. या उपोषणाला मुख्याध्यापक सुभाष दहिबावकर, संस्थाचालक लवू राणे, विजय कुडपकर, शिक्षक प्रतिनिधी सूर्यकांत म्हसकर, किरण राऊळ, दाजी घाडी, पालक सुनील कामतेकर, पुरूषोत्तम चिंदरकर, राजू कदम, नम्रता मिशाळ आदी उपोषणाला बसलेले आहेत.
खुडी माध्यमिक विद्यालय दंडास पात्र
खुडी माध्यमिक विद्यालय अनधिकृत असून या शाळेत ९० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३१ मे रोजी शाळा बंद करण्याची नोटीस दिली आहे. सन २०१३-१४ मध्ये शाळा बंद करण्याबाबत स्टॅम्पपेपरवर करारपत्र करून शाळा बंद करण्याची लेखी हमी संबंधित संस्था चालकांनी दिली असतानाही शाळा अनधिकृतपणे सुरू ठेवण्यात आली आहे. याचा इतर शाळांवर परिणाम होत आहे. तरी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार १ लाखाचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास मुख्याध्यापक व संस्था जबाबदार असेल असे स्पष्ट करतानाच अनधिकृत शाळेत पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी देवीदास कुलाल यांनी केले आहे. संबंधित खुडी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट
केले. (वार्ताहर)