गडगडीच्या पाण्यासाठी २५पासून उपोषण

By admin | Published: January 19, 2016 11:05 PM2016-01-19T23:05:06+5:302016-01-19T23:41:02+5:30

जाधव यांचा इशारा : तहसील कार्यालयासमोर आंदोलन

Fasting from Thunderstorms 25 | गडगडीच्या पाण्यासाठी २५पासून उपोषण

गडगडीच्या पाण्यासाठी २५पासून उपोषण

Next

देवरुख : गडगडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावे, तसेच देवरूख येथील डॉ. आंबेडकर वसतिगृह शासनाच्या जागेत स्थलांतरीत व्हावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी अ. वि जाधव आणि कार्यकर्ते देवरुख तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बेमुदत उपोषण छेडणार आहेत.या उपोषणाला सिद्धार्थ कासारे पाठिंबा देणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील वाशी-किंजळे येथील गडगडी धरणाला सुमारे ३०पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. धरणामध्ये कित्येक कोटी रुपयांचा निधी जिरला आहे. मात्र, तीस वर्षांच्या कालावधीनंतरही वाशी, काटवली, देवळे, फणसवळे, शेरेवाडी, सायले, विघ्रवली, मुचरी, कोसुंब आदी गावातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही. कित्येक कोटी रुपये खर्च होऊनही पाणी उपलब्ध होत नाही, या गंभीर समस्येकडे शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. शासनाच्या अनास्थेमुळे येथील शेतकरी वंचित राहिले आहेत.शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता अ. वि. जाधव आणि कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाचे अस्त्र हाती घेतले आहे.
सुमारे ३० ते ३२ वर्षे गडगडी धरणाचे काम चालू आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडलेले आहेत. परंतु शासनकर्त्यांना अजिबात देणे-घेणे नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला साथ देऊन दूध उत्पादन करण्यासाठी या भागात २५० संकरीत गाई खरेदी केल्या जाणार आहेत. काटवली सहकारी दूध संस्था १०० गाई शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी साथ देणार आहे. हिरवा चारा पाण्याशिवाय निर्माण होणार नाही म्हणून या आंदोलनाद्वारे आम्हाला कालव्याद्वारे गडगडी धरणाचे पाणी पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.
तसेच देवरूख येथे डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतिगृह गेली अनेक वर्षे भाड्याच्या खासगी जागेत खितपत पडलेले आहे. शासनाने एक कोटी वीस लाख रुपयात जागेसह तयार इमारत खरेदी केली आहे. इमारत अनेक वर्षे बंद असल्याने दुरुस्तीला आली आहे. दुरुस्तीसाठीही निधी मंजूर होता. परंतु तो निधी परत का पाठवण्यात आला, ही बाब ही गंभीर आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)


गडगडी धरण : शेतकऱ्यांना पाणी द्या
संगमेश्वर तालुक्यात ३० वर्षापासून गडगडी धरणाचे काम सुरू आहे. या धरणासाठी कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तरीदेखील धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. या धरणातील पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे अद्याप दुर्लक्षच करण्यात आले आहे. ही मागणी शासनस्तरावरून अद्याप पूर्ण झालेली नाही. या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. केवळ आंदोलन करण्यापलिकडे येथील शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहिलेले नाही. देवरूख तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनातून ही मागणी पूर्णत्वास जाण्याची आशा आहे.


वसतिगृहासाठी लढा
देवरुख येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. तरीदेखील गेली अनेक वर्षे भाड्याच्या जागेत खितपत पडावे लागत आहे.

Web Title: Fasting from Thunderstorms 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.