बांदा नवभारत शिक्षण संस्थेविरोधात उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:19 AM2019-02-07T11:19:28+5:302019-02-07T11:21:25+5:30
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेने शासनमान्यता नसलेले व प्रत्यक्ष कार्यरत नसलेले ९ शिक्षक दाखवून त्यांच्या नावाने अनुदान लाटले आहे. यामुळे संस्थेचे व बांदा गावाचे नाव बदनाम होत आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा या शाळेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा भाजपचे पंचायत समिती सदस्य वसंत उर्फ शीतल राऊळ यांनी बुधवारी निवेदनाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना दिले आहे.
सिंधुदुर्गनगरी : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेने शासनमान्यता नसलेले व प्रत्यक्ष कार्यरत नसलेले ९ शिक्षक दाखवून त्यांच्या नावाने अनुदान लाटले आहे. यामुळे संस्थेचे व बांदा गावाचे नाव बदनाम होत आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा या शाळेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा भाजपचे पंचायत समिती सदस्य वसंत उर्फ शीतल राऊळ यांनी बुधवारी निवेदनाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना दिले आहे.
या निवेदनात धी बांदा नवभारत शिक्षण मंडळ मुंबई या संस्थेच्या ९ माध्यमिक शाळा आहेत. संस्थेने २०१० ते २०१२ या कालावधीत ९ शिक्षकांच्या नेमणूक केल्याचे भासवून गेल्या दोन महिन्यात या बोगस शिक्षकांची शिक्षण खात्याकडून मान्यता मिळविली. २०१८-१९ च्या समायोजनात याच ९ शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव या संस्थेने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे.
यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे ही समायोजन प्रक्रिया करू नये अशी मागणी केली होती. त्यानंतर शीतल राऊळ यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. मंत्री तावडे यांच्या आदेशानुसार संस्थेला खुलाशाची नोटीस बजावण्यात आल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बोगस पटसंख्या दाखवून अनुदान लाटले
याबाबत माहिती देताना संस्थेच्या कुडासे हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक प्रेमानंद नाडकर्णी यांनी, शिवसेनेचा दोडामार्ग तालुक्यातील जबाबदारी पदाधिकारी याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण यापूर्वी हा आरोप केला असता त्याने आम्ही स्वार्थासाठी आरोप करीत असल्याचे म्हटले होते. मात्र, आता माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संस्थेला लेखी खुलासा देण्याची नोटीस बजावल्याने हे सर्वच उघड झाले आहे.
या संस्थेने यापूवीर्ही बोगस पटसंख्या दाखवून ४३ लाखांचे अनुदान लाटले होते. त्यानंतर या संस्थेच्या सहा शाळांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, कुडासे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजय परब उपस्थित होते. या निवेदनावर अन्य प्रतिष्टीत व्यक्तींच्या स्वाक्षरी आहेत.