मडुऱ्यातील काँग्रेस कार्यकर्त्याचा तापाने मृत्यू
By admin | Published: September 17, 2015 10:14 PM2015-09-17T22:14:23+5:302015-09-18T23:38:04+5:30
राजकीय चिकाटी असलेला कार्यकर्ता
बांदा : शिवसेनेचे माजी बांदा विभागप्रमुख व सध्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते मदन राजाराम परब (वय ४८, रा. मडुरा-परबवाडी) यांचे गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. ते पंधरा दिवस तापाने आजारी होते. गणेश चतुर्थीदिवशीच त्यांचे निधन झाल्याने परब कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मदन परब यांनी ताप येऊ लागल्याने प्रथम बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. मात्र, ताप कमी होत नसल्याने त्यांना सावंतवाडी येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, ताप व त्यातच कावीळ झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल केले होते. गेले दहा दिवस त्यांच्यावर गोवा येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. मदन परब हे गोवा राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून कार्यरत होते. गोव्यात कार्यरत असताना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरोधातही मदन परब यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
राजकीय चिकाटी असलेला कार्यकर्ता
त्यांच्या राजकीय चिकाटीचे व आक्रमकपणाचे त्यावेळी पर्रीकर यांनी देखील कौतुुक केले होते. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मदन परब यांनी बांदा येथे येत शिवसेनेचे कार्य सुरू केले. त्यावेळी त्यांच्याकडे विभागप्रमुख पदाचा कार्यभार देण्यात आला होता. सेनेचे कार्य सुरू केल्याने त्यांना राणे समर्थकांकडून वेळोवेळी त्रासही देण्यात आला.
विरोध झुगारुन त्यांनी काही कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेनेची बांद्यात पहिली शाखा पोलीस बंदोबस्तात सुरू केली होती. बांदा परिसरात त्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, सेनेतील वरिष्ठांकडून त्यांना वेळोवेळी डावलण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी लोकसभा निवडणुुकीत नीलेश राणे यांचे काम केले होते. त्यानंतर ते आजपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. आजारपणामुळे ते राजकारणापासून दूर होते.