बाप लेकाचे एकापाठोपाठ निधन, सिंधुदुर्गातील हरकुळखुर्द येथील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:57 IST2025-04-04T17:55:19+5:302025-04-04T17:57:34+5:30
कणकवली: हरकुळखुर्द बौद्धवाडी येथील सखाराम तुकाराम हरकुळकर (वय-६५) व राजकुमार सखाराम हरकुळकर (२७) या बाप लेकाचे एकापाठोपाठ दुर्दैवी निधन ...

बाप लेकाचे एकापाठोपाठ निधन, सिंधुदुर्गातील हरकुळखुर्द येथील दुर्दैवी घटना
कणकवली: हरकुळखुर्द बौद्धवाडी येथील सखाराम तुकाराम हरकुळकर (वय-६५) व राजकुमार सखाराम हरकुळकर (२७) या बाप लेकाचे एकापाठोपाठ दुर्दैवी निधन झाले.
सखाराम तुकाराम उर्फ बाबु हरकुळकर यांचा मुलगा राजकुमार याला दोन दिवसापुर्वीच पणजी गोवा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा तरुण आधारवड असलेल्या मुलाची प्रकृतीबाबत त्यांना काळजी वाटत होती. बाबु हरकुळकर हे मंगळवारी संध्याकाळी चहा पिण्यासाठी बसले होते. दरम्यान, त्यांना राजकुमारची प्रकृती चिंताजनक झाल्याचे समजल्याने ते तेथेच कोसळले. हदय विकाराचा झटका येऊन जागीच गतप्राण झाले.
त्यांचा अंतविधी बुधवारी सकाळी १० वाजता पार पडत असतानाच त्यांचा तरुण मुलगा राजकुमार याचे अल्प आजाराने निधन झाल्याची बातमी आली. त्याच्यावर दुपारी चार वाजता वडीलांच्याच चिते शेजारी अग्नी देण्यात आला. राजकुमार हा भाऊ म्हणून परिसरात ओळखला जात होता. तो परोपकारी व दुसऱ्याच्या मदतीला धावुन जाणारा होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ एक विवाहित बहिण, आई असा परिवार आहे.