पोलिस व्हॅनच्या धडकेत पिता-पुत्र जखमी

By admin | Published: December 22, 2016 12:30 AM2016-12-22T00:30:21+5:302016-12-22T00:30:21+5:30

सावंतवाडीत अपघात : पंचनाम्यापूर्वी वाहने हलविल्याने नागरिक आक्रमक; किरकोळ बाचाबाची

Father and son hurt in police van | पोलिस व्हॅनच्या धडकेत पिता-पुत्र जखमी

पोलिस व्हॅनच्या धडकेत पिता-पुत्र जखमी

Next

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील आपले काम संपवून कुडाळ-तेंडोलीच्या दिशेने घरी जाणाऱ्या पिता-पुत्राच्या दुचाकीला रुग्णालयासमोरच्या महामार्गावर पोलिस व्हॅनने धडक दिली. यात विजय बाबू वेंगुर्लेकर (वय ४५) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांचा मुलगा दुचाकीस्वार विनय वेंगुर्लेकर (२५) याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना अधिक उपचारांसाठी बांबुळी-गोवा येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातानंतर पंचनामा करण्यापूर्वीच पोलिसांनी आपल्या व्हॅनची जागा बदलली. तसेच जखमीचे रक्त पडलेले ठिकाण अग्निशामक बंबाने धुऊन घेतल्याने नागरिक आक्रमक झाले होते. यावेळी पोलिस व नागरिक यांच्यात किरकोळ बाचाबाचीही झाली. मात्र, उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. हा अपघात बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कामानिमित्त आलेले विजय वेंगुर्लेकर व त्याचा मुलगा विनय वेंगुर्लेकर हे स्वत:ची दुचाकी (एमएच ०७ वाय ११२४) घेऊन घरी तेंडोलीला परतत असताना रुग्णालयाच्या जवळच्या उतारावर आले व कुडाळच्या दिशेने वळले. मात्र, त्याचवेळी महामार्गावरून सावंतवाडी पोलिस ठाण्याची व्हॅन (एमएच ०७ जी २०९७) घेऊन पोलिस प्रशांत सुरेश धुमाळे पोलिस ठाण्याच्या दिशेने जात असतानाच व्हॅन वेगात दुचाकीला धडकली. या धडकेत विजय वेंगुर्लेकर यांच्या पायाचे हाड व्हॅनच्या पुढच्या चाकात अडकले, तर डोके रस्त्यावर आदळले. तसेच हातालाही जोरदार दुखापत झाली. तर विनय याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तातडीने गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.
अपघात झाला त्यावेळी पोलिस व्हॅनही रस्त्याच्या विरुद्ध दिशेला अपघातग्रस्त झाली होती. ती अचानक नेऊन एका बाजूला लावण्यात आली. हे काही प्रत्यक्षदर्शिंनी बघितले होते. मात्र, पोलिसांनी आपल्या गाडीला अपघात झालाच नाही, असा पवित्रा घेतला. तसेच नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी मागवून रस्त्यावर पडलेले जखमीचे रक्त धुतले. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी पोलिसांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला; पण कोणीच अधिकारी सुरुवातीला समोर आले नाहीत.
दरम्यान, घटनेची माहिती शहरात पसरली. शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार, बाळा कुडतरकर, भाऊ पाटील, बाबा आल्मेडा, आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. त्यांनी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना पंचनाम्यापूर्वी गाडी हलविल्याबद्दल जाब विचारला. तसेच कोणाच्या परवानगीने रक्ताचा सडा धुण्यात आला. अग्निशामक बंब कोणी बोलावला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, पोलिस यातील एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. अखेर पोलिसांनी नागरिकांच्या समक्ष पंचनामा केला. घटनास्थळावरून काही प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदविले आणि नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
नागरिक आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस हे अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून लोकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. काहीनी आक्रमक होत पोलिसांशी हुज्जत घेतली. अखेर पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविण्याचा इशारा देताच नागरिक पांगले. हा प्रकार महामार्गावर तब्बल दोन तास सुरू होता. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.
पोलिस उपनिरीक्षक जयदीप कळेकर, हेडकॉन्स्टेबल संजय हुबे, प्रवीण माने, राजू शेळके, प्रमोद काळसेकर, विकी गवस, मंगेश शिगाडे, आदींनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अपघाताचा अधिक तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Father and son hurt in police van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.