Sindhudurg: चराठे येथे घराची भिंत कोसळून बाप-लेक गंभीर जखमी
By अनंत खं.जाधव | Published: August 1, 2024 04:03 PM2024-08-01T16:03:45+5:302024-08-01T16:04:58+5:30
सावंतवाडी : गेले काही दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे चराठे गावठणवाडी येथे घराची भिंत कोसळून बाप लेक गंभीर जखमी ...
सावंतवाडी : गेले काही दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे चराठे गावठणवाडी येथे घराची भिंत कोसळून बाप लेक गंभीर जखमी झाले. यशवंत बिर्जे व मुलगा गणपत बिर्जे अशी जखमींची नावे आहेत. आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने त्यांची पत्नी योगिता आणि मुलगी अक्षता दुसऱ्या खोलीमध्ये झोपल्यामुळे त्या दोघी बचावल्या.
सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पडझडीच्या घटना घडत आहेत. चराठा गावठणवाडी येथे राहणाऱ्या यशवंत बिर्जे याचे घर आहे. पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराची मोठी भिंत कोसळली. गाढ झोपेत असलेले यशवंत बिर्जे आणि मुलगा गणपत बिर्जे हे दोघेही या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. यावेळी गणपत यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केल्यानंतर त्यांचे भाऊ विनायक आणि राजू बिर्जे यांनी तात्काळ धाव घेत त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले.
जखमी बाप-लेकांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गणपतच्या डोक्यावर खोल जखम झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. तर, यशवंत बिर्जे यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
भर पावसात व्हावे लागले बेघर
या घटनेत बिर्जे कुटुंबीयांचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. बिर्जे कुटुंबीयांची परिस्थिती गरिबीची असून इंदिरा आवास योजनेतून त्यांनी हे घर बांधले होते. या घटनेमुळे भर पावसात त्यांना बेघर व्हावे लागले. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. महसूल विभागाकडून घटनेची दखल घेत तातडीचा पंचनामा करणार असल्याचे सांगितले.