शेतकऱ्यांवर एफसीआयची अवकृ पा
By admin | Published: January 18, 2015 10:51 PM2015-01-18T22:51:27+5:302015-01-19T00:20:42+5:30
भातखरेदी थांबली : पावसानंतर आता नवा दणका...
विनोद पवार- राजापूर - निसर्गाची अवकृ पा व यावर्षी राज्यात कमी पडलेला पाऊस यामुळे राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. शेतात पिकत नसल्यामुळे विदर्भातला शेतकरी आत्महत्या करत आहे. तर दुसरीकडे फूड कॉर्पोेरेशन आॅफ इंडियाच्या अवकृपेमुळे आता कोकणातल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भातशेती करुन आर्थिक समृद्धतेची स्वप्न पाहणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्याला आता या भाताचे करायचे काय, असा यक्ष प्रश्न पडला आहे.एफसीआयच्या बदलेल्या धोरणांमुळे गतवर्षी खरेदी केलेले सुमारे २ लाख ९२ हाजर क्विंटल भात गोदामात पडून आहे. त्यामुळे, तर यावर्षीच्या भाताच्या खरेदीला एफसीआयने सुरुवात केलेली नाही. विदर्भापाठोपाठ आता कोकणातल्या शेतकऱ्याला आत्महत्येच्या विळख्यात सोडवण्यासाठी आता कोकणातल्या आमदारांनी एकत्र येऊन, उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.कोकणातला शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून वर्षभरात फक्त भात हे पीक घेतो. त्यातून आपल्या कुटुंबाची गुजराण करतो. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भात पिकवले जाते. या प्रांतात सिंचनाचा अभाव असतानादेखील केवळ चार महिने पडणाऱ्या पावसावर कोकणात मोठ्या प्रमाणात भात पिकवले जाते. आता कोकणातला शेतकरी बागायत शेतीकडे वहला असला तरी ही बागायतदारांची संख्या फारच नगण्य आहे. त्यामुळे अद्यापही शेतीतले प्रमुख पीक म्हणून भाताकडेच पाहिले जाते. वर्षाचे बारा महीने कष्ट करुन, पिकवलेल्या भातातील आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे भात शिल्लक ठेऊन उर्वरित भात विकले जाते व त्यातून वरखर्चाचा ताळमेळ कोकणातला शेतकरी बसवतो. मात्र, यावर्षी हा वरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न येथील शेतकऱ्याला पडला आहे.यावर्षी, फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले भात अद्यापही एफसीआयच्या गोदामात पडून आहे. त्यामुळे, या पावसाळ्यात शेतकऱ्याने पिकवलेले भात खरेदी करण्यास एफसीआयने सुरुवात केलेली नाही. गतवर्षात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातापैकी अद्यापही सुमारे २ लाख ९७ हजार क्विंटल भात गोदामात पडून आहे. आता हा तिढा सोडवण्यासाठी राजकीय हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली असून, या चारही जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी पक्षभेद विसरुन एकत्र येत आपल्या कोकणी शेतकऱ्याला वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे.
आर्थिक संकट उभे
एफसीआयने गतवर्षी कोकणातील चारही जिल्ह्यात खरेदी केलेल्या भातापैकी सिंधुदुर्गात १७ हजार क्विंटल, रत्नागिरीत २५ हजार क्विंटल, ठाण्यात २५ हजार क्विंटल तर रायगडमध्ये तब्बल २ लाख क्विंटल धान्य पडून आहे. त्यामुळे अद्यापही एफसीआयने यावर्षीचे भात खरेदी करण्यास सुरुवात केलेली नाही. या चारही जिल्ह्यात एफसीआय त्या त्या तालुक्यातील खरेदी विक्री संघामार्फ त शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करते. मात्र, यावर्षी भात खरेदी करण्याच्या सूचनाच अद्यापही न आल्याने खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांकडून भातखरेदीला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणातील या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.