आंबा हंगाम लांबण्याची भीती
By Admin | Published: July 8, 2014 11:00 PM2014-07-08T23:00:32+5:302014-07-08T23:16:20+5:30
कलमे पुन्हा पालवण्याची शक्यता : पावसाच्या ओढीमुळे पालवलेल्या झाडांना किटकांचा प्रादुर्भाव
नरेंद्र बोडस : देवगड , देवगडसह संपूर्ण कोकणामध्ये मृग नक्षत्र कोरडेच गेले. पावसाच्या सुरुवातीनंतर आंबा कलमे जून मध्यानंतर पालवू लागली. बहुतांश झाडे पालवली. मात्र, पावसाच्या ओढीमुळे पालवलेली झाडे किटकांच्या हल्ल्यामुळे हतबल झाली. कोवळी पालवी किटकांनी खाऊन टाकल्यामुळे पालवण्याची प्रक्रिया पुन्हा दिसून येईल अशी भिती बागायतदार व्यक्त करीत आहेत. एकंदरीत पावसाच्या ओढीमुळे आॅक्टोबर मध्याच्याही पुढे पाऊस सुरु राहील असा अंदाजही जाणकार बागायतदार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आंबा हंगामाची सुरुवात नोव्हेंबर मध्यानंतरच होईल, अशीही भीती त्यांना वाटत आहे. दरम्यान, पावसाची ओढ संपल्याची चिन्हे असून तालुक्यात रविवार, सोमवारी पावसाच्या मोठ्या सरींनी बागायतदारांना दिलासा दिला आहे. पावसाचे आगमन पुन्हा जोरदारपणे होईल या आशेवर बागायतदारांची पुढील हालचाल अवलंबून आहे. त्यामुळे यावर्षी उशिराने दाखल झालेल्या पावसाचा फटका शेती बागायतींप्रमाणेच कोकणातील सर्वात मोठे पीक म्हणून नावारूपास आलेल्या आंबा पिकालाही बसला आहे. त्यावर आता योग्य उपाययोजना करण्याची गरज मोठ्या संख्येने निर्माण झाली आहे. यावर्षी तुडतुड्या, फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात राहिला होता. कोष स्थितीत असलेल्या तुडतुड्याच्या अंड्यातून पावसामुळे किटक निर्मिती होत आहे. त्यामुळेच चांगली पालवी या हल्ल्याचे लक्ष झाली आहे. बहुतांश पालवी कुरतडली जावून नष्ट होत आहे.त्यामुळे ही झाडे परत एकदा पालवण्याची दाट शक्यता बागायतदार व्यक्त करीत आहेत. किटकनाशक फवारणीही करावी लागणार- तुडतुड्यांची प्रभावी शक्ती लक्षात घेऊन मोठ्या बागायतदारांना आंबा कलमांना तुडतुड्या प्रतिबंधक व नाशक फवारणीचीही आवश्यकता वाटत आहे. पावसाच्या ओढीचा अंदाज घेऊन काही बागायतदारांनी तसा प्रयत्न करून पुढील नुकसान टाळण्याचा प्रयत्नही या भागात केला आहे. मात्र, यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होण्याचीही शक्यता आहे. उत्पादनातील घट टाळायची असेल तर तसा धोका पत्करल्याखेरीज बागायतदारांनाही पर्याय दिसत नसल्याचे चित्र आहे.