Sindhudurg: पावसाळ्यात मळगाव घाटीतील रस्त्यावर अपघाताची भिती, गॅस पाईपलाईनचे काम अर्धवट स्थितीत
By अनंत खं.जाधव | Published: May 21, 2024 03:32 PM2024-05-21T15:32:17+5:302024-05-21T15:32:47+5:30
सावंतवाडी : सावंतवाडी रेडी राज्य मार्गावरील मळगाव घाटीत गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी तोडण्यात आलेले पक्के काँक्रीट गटारीचे काम आता ...
सावंतवाडी : सावंतवाडी रेडी राज्य मार्गावरील मळगाव घाटीत गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी तोडण्यात आलेले पक्के काँक्रीट गटारीचे काम आता पावसाळा तोंडावर असताना देखील अर्धवट स्थितीत आहे. आठ दिवसात हे काम पूर्ण करा अन्यथा मळगाव घाटीतच उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांनी दिला आहे.
मळगाव घाटीतील पक्के काँक्रीट गटार गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी तोडण्यात आले आहेत. गेली दोन वर्षे हे काम सुरू आहे. गतवर्षी देखील गटाराचे काम अर्धवट राहिल्याने पावसाच्या पाण्यासोबत माती रस्त्यावर वाहून आल्याने अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागले होते. यावर्षी तर पक्के काँक्रीट गटार तोडल्याने व माती तशीच सोडलेली असल्याने पहिल्याच पावसात सर्व माती रस्त्यावर येऊन चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊ शकते. त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागणार आहे.
याप्रश्नी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधून देखील कोणतीच हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वीच हे गटार काँक्रीटने बांधण्यात आले होते. मात्र गॅस पाईपलाईनसाठी ते ब्रेकरने तोडण्यात आले. त्यामुळे रस्ता वाहून जाण्याची भीती देखील निर्माण झाली आहे.
एकीकडे सावंतवाडी शहरातील खोदण्यात आलेला रस्ता तसेच साईडपट्टी डांबरीकरणाने पूर्ववत केलेली असताना मळगाव घाटी तसेच घाटीच्या खालील गावात असलेली गटार व साईडपट्टी मात्र दुर्लक्षित आहे. त्यामुळे येथे आठ दिवसात सदर गटार पूर्वीप्रमाणेच काँक्रीटने बांधून मिळावेत तसेच साईड पट्टीची ही काँक्रीटनेच डागडूजी करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. तसेच याबाबत टाळाटाळ झाल्यास ग्रामस्थांसह मळगाव घाटीतच उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.