कोल्ह्यांना पळवण्यासाठी स्पीकरवर वाघाची डरकाळी, चिपी विमानतळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 11:25 AM2022-06-18T11:25:29+5:302022-06-18T11:26:38+5:30
Chipi Airport News: विमान लँडिंग झाल्यानंतर विमानतळ परिसरात फारतर वाहने, यंत्रे वा कर्मचाऱ्यांचा आवाज कानावर पडतो; पण सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर सध्या वाघाचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत.
मुंबई : विमान लँडिंग झाल्यानंतर विमानतळ परिसरात फारतर वाहने, यंत्रे वा कर्मचाऱ्यांचा आवाज कानावर पडतो; पण सिंधुदुर्गच्याचिपी विमानतळावर सध्या वाघाचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत. बरे, खराखुरा वाघ हे आवाज काढत नसून, कोल्ह्यांना पळवून लावण्यासाठी स्पीकरवर रेकॉर्डिंग लावले जात आहे. कोल्ह्यांमुळे विमान प्रचलनात अडथळे येत असल्याने चिपी विमानतळ प्रशासन आणि वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
चिपी विमानतळ परिसरात २५ ते ३० सोनेरी कोल्ह्यांनी वास्तव्य केले असून, ते सतत धावपट्टीवर येत असतात. त्यामुळे लँडिंग आणि टेक-ऑफ करताना अडथळे येत आहेत. विमानतळावर तैनात असलेले कर्मचारी या कोल्ह्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात; पण काही वेळाने ते पुन्हा दृष्टीस पडतात. त्यामुळे विमानसेवेवर परिणाम होऊ लागला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आजवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या; परंतु त्या फोल ठरल्या. त्यामुळे या कोल्ह्यांना पळवून लावण्यासाठी आता स्पीकरवर वाघाचा आवाज लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, विमान येण्याअगोदर काही काळ ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून धावपट्टीच्या परिसरात वाघाच्या डरकाळ्या स्पीकरवर ऐकवल्या जातात, असे एका कर्मचाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
विमानतळावर कोल्हे का येतात?
चिपी विमानतळ २७५ एकरांत पसरले आहे. चहू बाजूंनी उंच कुंपण बांधण्यात आले असले, तरी हा दाट गवताळ प्रदेश असल्याने कोल्ह्यांनी तेथे वास्तव्य केले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची २ अंतर्गत सोनेरी कोल्हा (गोल्डन जॅकल्स) हा संरक्षित प्राणी घोषित करण्यात आला आहे. तो सर्वभक्षक आहे. फळे, पक्षी, कीटक, मासे आणि लहान सस्तन प्राणी खातो. या कोल्ह्याची शिकार आणि व्यापार हा दंडनीय गुन्हा आहे.