कणकवली भूमिअभिलेख कार्यालयाविरोधात जनतेचा संताप, वायंगणकर दांपत्याने केले उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 07:03 PM2019-05-20T19:03:17+5:302019-05-20T19:07:23+5:30
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पावणादेवी येथील मारूती बाळकृष्ण वायंगणकर यांनी कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात आपली जमिन मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार सातवेळा मोजणी होऊन देखील हद्द दाखविण्यास संबंधित भूमापकाकडून दुर्लक्ष केला जात आहे. कार्यालयात अनेकदा फेऱ्या मारूनही भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करण्यास टाळाटाळ केल्याने मारूती वायंगणकर आणि त्यांची पत्नी विजया वायंगणकर यांनी सोमवारी कार्यालया समोर उपोषणाचा पवित्रा घेतला.
कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पावणादेवी येथील मारूती बाळकृष्ण वायंगणकर यांनी कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात आपली जमिन मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार सातवेळा मोजणी होऊन देखील हद्द दाखविण्यास संबंधित भूमापकाकडून दुर्लक्ष केला जात आहे. कार्यालयात अनेकदा फेऱ्या मारूनही भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करण्यास टाळाटाळ केल्याने मारूती वायंगणकर आणि त्यांची पत्नी विजया वायंगणकर यांनी सोमवारी कार्यालया समोर उपोषणाचा पवित्रा घेतला.
दरम्यान, या आंदोलना नंतर अधिकाऱ्यांना जाग आली असून २९ मे रोजी पुन्हा मोजणी करण्याचे लेखी आश्वासन वायंगणकर याना देण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
कणकवली भूमिअभिलेख कार्यालयासमोर फोंडाघाट येथील मारूती वायंगणकर व विजया वायंगणकऱ यांनी सोमवारी उपोषण केले.(सुधीर राणे )
कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात जमीन मोजणीसह अनेक प्रकरणे प्रलंबीत आहेत. कार्यालयातील रिक्तपदे व भूमिअभिलेख उपअधिक्षक प्रभारी असल्याने कामावर परिणाम होत आहे. भूमापकांची कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात रिक्त पदे असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे जमीन मोजणी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. नकाशा नक्कल, जमिन मोजणी, प्रापर्टी कार्ड यासह विविध कामांसाठी या कार्यालयात येणाºया पक्षकारांची मोठी हेळसांड होत असल्याने जनतेतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मारूती वायंगणकर फोंडाघाट येथिल ११० गुंठे जमिन मोजणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून कार्यालयात पाठपुरावा करत आहेत. अनेकदा मोजणी तारीख देऊनही भूमापकांकडून टाळाटाळ करण्यात आली. जमिनीतील झाडे वाढल्याने ती तोडण्यासाठी पुन्हा पुन्हा वायंगणकर यांना खर्च करावा लागला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागला आहे.
भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी व भूमापक यांच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मारूती वायंगणकर व विजया वायंगणकर या दोनही ज्येष्ठांनी उपोषण सुरू केले होते. उपोषण सुरू करताच अधिकाºयांची धावपळ सुरू झाली.
त्यानंतर कणकवली भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी प्रकाश भिसे यांनी वायंगणकर यांच्याशी चर्चा केली. तसेच उपोषणस्थळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीसही दाखल झाले होते. या चर्चेनंतर वायंगणकर यांची मोजणी २९ मे रोजी करून देण्याचे लेखी आश्वासन भिसे यांनी दिले. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वायंगणकर दांपत्याने जमिन मोजणीसाठी केलेले उपोषण मागे घेतले.