सिंधुदुर्गात खासगी तत्त्वावर फुडपार्क
By admin | Published: February 28, 2016 01:02 AM2016-02-28T01:02:30+5:302016-02-28T01:02:30+5:30
शंभर एकरात प्रकल्प : २०० कोटींची गुंतवणूक; २२ उद्योगांचा समावेश
अनंत जाधव ल्ल सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बजाज हेल्थ केअर कंपनी खासगी तत्त्वावर फुडपार्क प्रकल्प उभारत असून, या माध्यमातून कंपनी दोनशे कोटींची गुंतवणूक करणार आहे. प्रकल्पासाठी जागेची चाचपणी सध्या सुरू आहे. जागेसाठी पहिली पसंती सावंतवाडी परिसराला देण्यात आली आहे. हा फुडपार्क प्रकल्प शंभर एकर जागेत होणार आहे. त्यामध्ये २२ वेगवेगळे उद्योग उभारण्यात येणार आहेत. या फुडपार्कच्या माध्यमातून पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा कृषी विभागाकडून पणन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळाले नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात फुडपार्क प्रकल्पासाठी मोठा वाव आहे. येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बागायती असून, त्या माध्यमातून शेतकरी वेगवेगळे उत्पादन घेत असतो. पण त्यांच्या मालाला हवी तशी किंमत मिळत नाही. यासाठी बजाज हेल्थ केअर ही कंपनी फुडपार्कच्या माध्यमातून येथील आंबा, केळी, फणस, चिकू, स्ट्रॉबेरी, टॉमेटो, पेरू, कोकम आदी लागवडीला विशेष प्रोत्साहन देणार आहे. या धर्तीवर बजाज कंपनीच्यावतीने माणगाव तसेच आंबोली येथे मोठ्या प्रमाणात टॉमेटोची लागवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखादा फळ लागवडीवर प्रक्रिया करणारा उद्योग उभारल्यास त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यादृष्टीने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बजाज कंपनीला आग्रह केला होता. त्यानंतर कंपनीने सिंधुदुर्गमध्ये प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. कंपनी तब्बल दोनशे कोटींची गुंतवणूक करून फुडपार्क प्रकल्पाची उभारणी करणार आहे. फुडपार्क प्रकल्प शंभर एकर जागेत असून, त्यात २२ प्रकिया उद्योग उभारले जाणार आहेत. बजाज कंपनीने फुडपार्क उभारणीसाठी पहिले प्राधान्य सावंतवाडी परिसराला दिले असून, मळेवाड, आजगाव धाकोरे आदी गावांमध्ये कंपनीने जागेची चाचपणी केली. पण त्यांना हवा तसा पाण्याचा पुरवठा अद्याप सापडला नाही.
त्यामुळे कंपनीने सावंतवाडीबरोबरच दोडामार्ग तालुक्यातही जागेसाठी चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, कंपनी खासगी तत्वावर फुडप्रकल्प उभा करीत असल्याने या पार्कला केंद्र सरकारची मंजुरी गरजेची आहे. कंपनीचा प्रस्ताव जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून राज्याच्या कृषी व पणन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर तो केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी जाणार आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या उभारणीस रितसर सुरूवात होणार आहे.
फुडपार्कमुळे विकासाला गती मिळेल : केसरकर
सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात फळ लागवड सुरू आहे. मात्र, त्यांना योग्य अशी बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यामुळेच खासगी तत्त्वावर फुडपार्क प्रकल्प उभारण्यात येणार असून, या माध्यमातून थेट ५ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला लवकरच सरकारकडून मान्यता मिळवून देण्यात येणार असल्याचे राज्याचे ग्राम विकास व अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.