माणसी १५ किलो अन्नधान्याचा पुरवठा हवा
By Admin | Published: July 3, 2014 11:55 PM2014-07-03T23:55:45+5:302014-07-03T23:58:40+5:30
दक्षता समिती सभेत ठराव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना
देवगड : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य पुरवठ्यामध्ये सुधारणा करून माणसी १० किलो तांदुळ व ५ किलो गहू असे १५ किलो धान्य देण्याची सुधारणा कायद्यात करा, अशी मागणी करणारा ठराव दक्षता समिती अध्यक्ष आमदार प्रमोद जठार यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीच्या बैठकीत बुधवारी दुपारी तहसीलदार कार्यालयामध्ये करण्यात आला. यावेळी अध्यक्ष आमदार प्रमोद जठार, सचिव तहसीलदार जीवन कांबळे, भाजपा तालुकाध्यक्ष सदाशिव ओगले व अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत व उपलब्ध माहितीनुसार २०११ साली ३५ किलो प्रति कार्ड पुरवठ्याच्या निकषाच्या वेळी तालुक्याला २२६ मेट्रीक टन धान्य पुरवठा झाला होता. मात्र अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यावर तालुक्याला १९६ मेट्रीक टन धान्य पुरवठा झाला. म्हणजे प्रत्यक्षात ३० टन धान्यपुरवठा कमीच झाला असल्याची बाब यावेळी पुढे आली. म्हणजे ३० हजार किलो धान्य प्रत्यक्षात देवगडच्या जनतेला कमी मिळाले आहे. त्यामुळे आता या कायद्यात सुधारणा करून माणसी १० किलो तांदुळ व ५ किलो गहू असा १५ किलो धान्य पुरवठा व्हावा अशी सूचना करणारा ठराव सभेने मंजूर केला.
यानंतर आंबा बागायतदारांच्या मागणीनुसार सफेद केरोसिनचा पुरवठा व्हावा व त्यासाठी ठेकेदाराची नेमणूक व अन्य बाबींसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे तहसीलदार जीवन कांबळे यांनी मान्य केले. तसेच आगामी गणेशोत्सवाची वाढीव मागणी लक्षात घेऊन अन्नधान्य पुरवठ्यात वाढ करण्याची सूचनाही आमदार प्रमोद जठार यांनी केली. (प्रतिनिधी)