वेंगुर्लेतील मच्छिमारांचे धरणे

By admin | Published: December 26, 2016 11:50 PM2016-12-26T23:50:08+5:302016-12-26T23:50:08+5:30

समुद्रात ठिय्या : पर्ससीन मासेमारीवर कारवाईची मागणी

Fencing of fencing in Venturland | वेंगुर्लेतील मच्छिमारांचे धरणे

वेंगुर्लेतील मच्छिमारांचे धरणे

Next

वेंगुर्ले : सागरी भागात राजरोसपणे सुरू असलेल्या मिनी पर्ससीन मासेमारीवर कारवाई करण्यास शासनाचा मत्स्य विभाग टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ वेंगुर्ले बंदर येथील समुद्रात वेंगुर्ले तालुका पारंपरिक मच्छिमार संघटनेच्यावतीने सोमवारी भव्य लाक्षणिक धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनात मच्छिमारांनी मोठ्या संख्येने सहभागी घेत मिनी पर्ससीनबाबतची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘एक रुपयाचा कडीपत्ता-पालकमंत्री झाले बेपत्ता, समुद्र आमच्या हक्काचा-नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणांनी सोमवारी वेंगुर्ले बंदर दणाणून गेले. पर्ससीन मासेमारीवर कडक कारवाई न केल्यास २६ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा वेंगुर्ले पारंपरिक मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम रेडकर यांनी मत्स्य विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त यांना इशारा दिला असून, सागरी भागातील अतिक्रमण थांबविण्यासाठी तहसीलदार यांनी फौजदारी गुन्ह्याची तरतूद करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
वेंगुर्ले बंदर येथील या आंदोलनात नॅशनल फिश वर्कर फोरमनचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व भाजप मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर, मालवण येथील नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रमेश धुरी, आचरा बंदर संघटनेचे अध्यक्ष नारायण कुबल, आचरा महिला मच्छिमार नेत्या आकांक्षा कांदळगांवकर, वेंगुर्ले तालुका पारंपरिक मच्छिमार संघटना अध्यक्ष दत्ताराम रेडकर, ज्येष्ठ मच्छिमार नेते जयहरी कोचरेकर, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष खलिल वस्त, श्रमिक मच्छिमार संघटनेचे मिथून मालवणकर, संजय केळुसकर, भाऊ मोर्जे, मूठ मच्छिमार सोसायटीचे चेअरमन सुभाष गिरप, केळूस सहकारी संस्था सदस्य गुरू जोशी, वेंगुर्ले तालुका मच्छिमार संघटना सल्लागार हेमंत गिरप, रामचंद्र राऊळ, भाग्यवान गिरप, दशरथ कुर्ले यांच्यासह जवळपास २०० हून अधिक पारंपरिक मच्छिमारांनी सहभाग घेतला होता.
सकाळी आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी समुद्रात आपले ट्रॉलर्स उभे करून ठेवत काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली. मात्र, आंदोलन सुरू होऊनही प्रशासनाचा एकही अधिकारी तसेच तहसीलदार आंदोलनस्थळी दाखल झाले नसल्याने मच्छिमारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा पर्ससीनवर अद्यापपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही. पालकमंत्र्यांनी मच्छिमार संघटना व त्यांच्या मागण्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. याबाबतही आंदोलनात त्याचा समाचार घेण्यात आला. आंदोलनावेळी महिला मच्छिमार यांनी भर उन्हात बसून आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. पोलिस निरीक्षक मधुकर आभाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्थळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेंगुर्लेचे नायब तहसीलदार बांदेकर यांनी आंदोलनाला भेट दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Fencing of fencing in Venturland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.