शिरोडा समुद्रात मच्छिमार बोट उलटली

By Admin | Published: August 26, 2016 01:04 AM2016-08-26T01:04:09+5:302016-08-26T01:11:32+5:30

एकजण बेपत्ता : पाचजणांना वाचविण्यात यश

Ferris boat overturned in Shiroda Sea | शिरोडा समुद्रात मच्छिमार बोट उलटली

शिरोडा समुद्रात मच्छिमार बोट उलटली

googlenewsNext

शिरोडा (जि. सिंधुदुर्ग) : शिरोडा-केरवाडी समुद्रात बुधवारी रात्री बोट उलटल्याने एक मच्छिमार बेपत्ता झाला असून, बोटीवरील अन्य पाचजणांचे जीव वाचविण्यात यश आले आहे.
श्रीराम प्रभाकर पेडणेकर ( वय ४५,
रा. केरवाडी-शिरोडा) असे बेपत्ता मच्छिमाराचे नाव आहे. पेडणेकर यांना शोधण्यासाठी गुरुवारी सकाळपासून शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, त्यात यश आले नाही.
शिरोडा-केरवाडी या समुद्रात बुधवारी सायंकाळी श्रीराम प्रभाकर पेडणेकर, प्रवीण आनंद मलबारी, अच्युत गोपाल मलबारी, संजय प्रभाकर पेडणेकर, रवींद्र मोहन माखले, विठ्ठल मोहन माखले हे सहा मच्छिमार इंजिन असलेल्या बोटीने मच्छिमारीसाठी गेले होते. ते रात्री साडेआठच्या सुमारास परतत असतानाच त्यांच्या बोटीचे इंजिन शिरोडा-केरवाडी येथील नदी व समुद्र संगमाजवळ बंद पडले. यावेळी मोठ्या प्रमाणात समुद्र खवळलेला होता.
समुद्र खवळलेला असल्याने बोट हेलकावे खाऊ लागली आणि उलटली. त्यात श्रीराम पेडणेकरांसह अन्य सहाजण पाण्यात फेकले गेले. यातील पाच मच्छिमारांनी कसेबसे पोहत किनारपट्टी गाठली. मात्र, श्रीराम पेडणेकर हे रात्री उशिरापर्यंत किनारपट्टीवर आले नाहीत. त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पुन्हा पाण्यात उड्या टाकल्या; पण त्यांना यश आले नाही.
ही घटना वेळागर-केरवाडी येथील मच्छिमारांना समजली. ते मच्छिमारही
समुद्र किनाऱ्यावर आले. त्यांनी समुद्रात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला;
पण रात्र झाल्याने पाण्याचा अंदाज येत नसल्याने त्यांनी हे शोधकार्य थांबविले. बचावलेल्या पाचही मच्छिमारांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेपत्ता मच्छिमार श्रीराम पेडणेकर यांचा शोध घेण्यासाठी वेंगुर्ले व शिरोडा येथील पोलिस पथक, तसेच कोस्टल गार्डचे अधिकारी गुरुवारी सकाळपासूनच घटनास्थळी दाखल झाले आहेत. समुद्रात पाच ते सहा बोटींच्या सहायाने शोधमोहीम राबविण्यात येत आहे. किनारपट्टीवरील अन्य मच्छिमारांनीही वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ferris boat overturned in Shiroda Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.