आमच्यासाठी २९ फेब्रुवारी भाग्याचाच दिवस
By admin | Published: February 29, 2016 10:51 PM2016-02-29T22:51:56+5:302016-03-01T00:10:24+5:30
जिल्ह्यात ११ मातांची झाली प्रसुती : चार वर्षातून एकदा येणार वाढदिवस
सावंतवाडी : वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसुतीची १० मार्च ही तारीख दिली होती. मात्र, २८ फेबु्रवारीलाच वेदना जाणवू लागल्याने येथील कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि २९ ला मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले. आमच्या कन्येचा वाढदिवस चार वर्षातून एकदा येणार असला, तरी हा दिवस आमच्यासाठी भाग्याचा आहे, असे मत आडेलकर कुटुंबियांनी व्यक्त केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ फेबु्रवारी या दिवशी तब्बल ११ मुलांना जन्म देण्यात आला आहे. हे विशेष आहे. यात सावंतवाडीत चार, कुडाळ तीन, कणकवली तीन, तर आरोस जिल्हा रूग्णालयात एक बालक जन्माला आले आहे.
२९ फेबु्रवारी हा दिवस चार वर्षातून एकदा येतो. त्यामुळे या दिवशी जन्माला येणाऱ्यांना विशेष महत्त्व असते. अनेक वेळा या दिवशी जन्माला येणाऱ्याचे वाढदिवस साजरे करताना तब्बल चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ‘लोकमत’ने जिल्ह्यात या दिवशी जन्माला येणाऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात आम्हाला ठिकठिकाणी दहा जण नवीन बालके जन्माला आल्याचे आढळून आले आहे. यात सावंतवाडी कुटीर रूग्णालयात दोन बालके जन्माला आली आहेत.
यामध्ये जान्हवी रामा आडेलकर (माडखोल) यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. तर कळणे येथील जान्हवी रामा कांबळे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तर सायंकाळी सावंतवाडीतील राजीनाबीबी आशिक शेख व दोडामार्ग तालुक्यातील भिकेकोनाळ येथील दर्शना सुधाकर सावंत यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. यातील जान्हवी आडेलकर यांचे कुटुंबीय म्हणाले, आम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १० मार्चही तारीख दिली होती. पण जान्हवी यांना असहाय्य वेदना होऊ लागल्याने आम्ही २८ फेबु्रवारीलाच येथील रूग्णालयात दाखल केले आणि २९ फेबु्रवारीला रात्री १२. ४५ च्या सुमारास कन्यारत्न प्राप्त झाले. आमच्यासाठी हा दिवस भाग्याचा असून, जरी चार वर्षांतून हा दिवस जरी येणारा असला, तरी आमचा उत्साह कायम आहे.
कुडाळ तालुक्यात तिघांना जन्म देण्यात आला आहे. यात नेहा रासम यांना कुडाळ ग्रामणी रूग्णालयात पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तर वर्षा बिड्ये व राजश्री वालावलकर यांना खाजगी रूग्णालयात पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. कणकवली तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालयातही तिघांची प्रसुती झाली आहे. यात देवगड-किंजवडे येथील दिक्षा दिनेश परब हिला कन्यारत्न, तर कणकवली-सोनवडे येथील विद्या विकास घाडी यांनाही कन्यारत्न प्राप्त झाले आहे. तर नांदगाव-मुस्लीमवाडी येथील बानू दाऊद साटविलकर यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तर ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात कर्नाटकातील पद्मवती वंडिवडर यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आजच्या दिवशी ११ जणांची प्रसुती झाल्यामुळे या कुटुंबीयांच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. (प्र्रतिनिधी)
दिवसाबरोबर नावातही साम्य
सावंतवाडी कुटीर रूग्णालयात २९ फेबु्रवारीला जन्माला आलेल्यांसाठी आजचा दिवस विशेष तर आहेच; शिवाय या दिवसाबरोबरच आणखी एक विशेष घडले ते जान्हवी रामा आडेलकर यांना कन्यारत्न, तर जान्हवी रामा कांबळे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यामुळे एकाच नावाच्या दोघा मातांची प्रसुती झाल्याने रूग्णालय परिसरात आश्चर्य व्यक्त करीत होते. यात मातेचे व त्यांच्या पतीचे नाव एक असून आडनाव तेवढे वेगळे आहे.