अवैध धंद्याविरोधात उपोषण अन् कारवाईही शांतच
By admin | Published: November 4, 2015 11:14 PM2015-11-04T23:14:52+5:302015-11-04T23:57:22+5:30
अवैद्य धंद्याचा विळखा सुटणार तरी कधी : अवैध धंद्याच्या ‘पाठबळा’चे न सुटणारे कोडेही कायम
राजन वर्धन - सावंतवाडी--अवैध धंद्याविरोधात भाजपने केलेले पायरी उपोषण.... त्यावर पोलिसांनी दिलेले कारवाईसाठीचे लेखी आश्वासन....आठ दिवसाच्या अंतिम मुदतीनंतरही सर्वकाही शांत शांत... दुसरीकडे अवैध धंदे मात्र आहेत त्याच पद्धतीने जोमात सुरू आहेत. जणू की भाजपच्या उपोषणालाही भीक घालू दिली नसल्याप्रमाणे त्यांना अभयच मिळाले. दरम्यान, हे सारे सुरू असतानाही इतर पक्षही शांत कसे काय? याचे गौडबंगालही शहरवासीयांना समजेनासे झाले आहे. तर सावंतवाडी शहराला पडलेला अवैध धंद्यांचा विळखा सुटणार तरी कधी? असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. सावंतवाडी शहरातील अवैध धंद्यांचा प्रश्न कित्येकवेळा कित्येक पक्षांनी उचलून धरला आहे. विविध मार्गांनी या धंद्याविरोधात आंदोलने करण्यात आली. त्याला किमान थोडे का असेना, यश मिळाले. पण हे धंदे मात्र बंद झाले नाहीत. त्यामुळे या धंद्यांना नेमके पाठबळ कोणाचे आहे? हा प्रश्न अनुत्तरीतपणे आजही येथील सामान्य माणसाला भेडसावत आहे. पोलीसही या धंद्याविरोधात कामगिरी करतात. पण ती तकलादू असते. त्यामुळे त्यांच्या कामगिरीबाबतही आणि शहरात चालू असणाऱ्या या धंद्याचीही विशिष्ट ‘अर्था’ने सांगड घातली जाते.
दरम्यान, शहरातील भाजपने याची गांभीर्याने दखल घेत अवैध धंदे पूर्णत: बंद करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना तीन महिन्यांपूर्वी निवेदने दिली. पण पोलिसांनी याबाबत कसलीच कार्यवाही न केल्याने पंधरा दिवसांपूर्वी स्मरणपत्र म्हणून पुन्हा पोलिसांना अवैध धंद्याविरोधात कारवाई करावी, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला. पण तरीही पोलिसांनी कारवाई न केल्याने शेवटी भाजपने सोमवारी २६ आॅक्टोबरला पायरी उपोषण केले. पोलीस निरीक्षक रणजीत देसाई यांनी भाजपाला आठ दिवसात कारवाईचे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यावयास लावले. पण भाजपनेही आठ दिवसाची डेडलाईन देत जर शहरातील अवैध धंद्याविरोधात ठोस कारवाई झाली नाही, तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला.
एकीकडे शहरात भाजपच्या या कृतीचे सामान्यांतून स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र सर्वच राजकीय पक्ष चिडीचूप होते. किंबहुना भाजपचे आंदोलन खोटे असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगत तोंडसुख मिळवण्यात त्यांनी धन्यता मानली. पण आपण अवैध धंद्याविरोधात नेमके काय करणार आहोत? याबाबत ‘ब्र’ही काढला नाही. जर का भाजपबरोबर युती असणाऱ्या सेना किंवा मनसे यांनी जोर धरला असता, तर शहरातील अवैध धंदे नक्कीच बंद झाले असते. पण रास्त हेतूवर एकत्र येतील. मग ते राजकीय पक्ष तरी कसले?
दरम्यान, आठ दिवस झाले तरी आजपर्यंत एकही कारवाई पोलिसांमार्फत झाली नाही की कुठे छापा टाकला गेला नाही. वास्तविक उपोषणाच्या इशाऱ्याने मोठमोठे वरिष्ठ अधिकारीही, मंत्रीही हबकतात. पण पोलिसांनी याबाबत काहीच गांभीर्य का घेतले नाही, हे न कळणारे कोडे सामान्य माणसाला पडले आहे. त्यामुळे या आठ दिवसात शहरातील अवैध धंदे बंद होतील, ही सामान्य माणसाची अपेक्षा फोल ठरलीच; अवैध धंद्यांना पाठीशी घालणारी अशी कोणती ‘ताकद’ आहे, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
शहरातील अवैध धंद्याविरोधातील आमची मोहीम ही सुंदर व स्वच्छ सावंतवाडीसाठी आहे. पोलिसांना आम्ही आठ दिवसाची अंतिम मुदत दिली होती. त्या दरम्यान सध्यातरी शहरातील जुगार बंद करण्यात आले आहेत. तर मटका व बेकायदेशीर दारूविक्रीवर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. पण तरीही शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करूनच आमचे आंदोलन थांबवले जाईल. पोलिसांच्या या कृतीनेच आम्ही पोलिसांना निवेदन देऊन दिवाळी सणानंतर अवैध धंदे बंद केले नाहीत, तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
- आनंद नेवगी, भाजप शहराध्यक्ष, सावंतवाडी.
पोलिसांमार्फत अवैध धंद्याविरोधातील कारवाई अविरत सुरू आहे. सध्या दोघा अवैध धंदेवाईकांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आनंद दत्ताराम नाटेकर (रा. मळगाव) याला जुगारप्रकरणी तर बेकायदा दारूप्रकरणी पावलू फ्रान्सिस फर्नांडीस (रा. कवठणी) यांचा समावेश आहे. शहरातही धाडसत्र सुरू आहे. तसेच पोलिसांमार्फत गस्त सुरू आहे. नागरिकांनी अशा अवैध धंद्याविरोधात पुढे येणे गरजेचे आहे.
- एस. एल. सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सावंतवाडी.