नरडवे प्रकल्पग्रस्त पुन्हा उभारणार लढा ! बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:29 PM2020-02-10T16:29:36+5:302020-02-10T16:32:11+5:30
शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकारातून हा प्रश्नमार्गी लावणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते संदेश पारकर यांनी प्रकल्पग्रस्ताना दिला.
कणकवली : नरडवे महमदवाडी धरणाचे काम पूर्ण गतिने सुरू आहे. मात्र, पुनर्वसनाचे काम पूर्णतः ठप्प आहे.गेली १८ वर्ष धरणग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत . केवळ टोलवा-टोलवीचे धोरण स्वीकारले जात असून येथील धरणग्रस्तांवर अन्याय होत आहे.परंतु यापुढे अन्याय होवू नये यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकारातून हा प्रश्नमार्गी लावणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते संदेश पारकर यांनी प्रकल्पग्रस्ताना दिला.
नरडवे महमदवाडी धरणग्रस्त समन्वय विकास समितीची शनिवारी नरडवे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी संदेश पारकर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभारण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख आनंद आचरेकर,मुंबईचे अध्यक्ष सुरेश ढवळ,मारुती ढवळ,नरडवे अध्यक्ष गणेश ढवळ,सचिव प्रभाकर ढवळ,प्रकाश सावंत,मधुकर पालव,लुईस डिसोझा,महेश कदम,सतीश परब,अजय नार्वेकर, सत्यवान कोळगे, रमेश जाधव, अशोक जाधव,मधुकर शिंदे, चंद्रकांत नार्वेकर, दिनेश ढवळ,चंद्रकांत कदम आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
प्रकल्प ग्रस्तांच्या वतीने अध्यक्ष गणेश ढवळ यांनी प्रमुख मुद्दे मांडले . यात वनसंज्ञातील ३४ हेक्टर जमीनी मधील घरे,गोठे,मांगर,फळ झाडे , जमीन व अन्य मालमत्ता संपादित करून भूसंपादन अधिग्रहण कायदा २०१३ च्या बाजारभावाने मोबदला मिळणे, पुनर्वसनासाठी सन १९९९ साली प्रथम कुटुंब संकलन यादि केली त्यावेळी ९६७ कुटूंबाना भूखंड वाटप करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.तथापि प्रकल्प होवून १८ वर्ष झाली आहेत.
स्वतंत्र कुटुंब आणखी वाढली आहेत.तरीही नवीन रजिस्टर तयार होवून त्या नुसार भूखंड वाटप व्हावे. सर्व धरणग्रस्त प्रामुख्याने शेतकरी असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन शेती हेच असल्याने पर्यायी शेतजमीनी शिवाय उदरनिर्वाह अवघड आहे.जमीनीच्या मूल्यांकनासाठी ६५ टक्के रक्कम भरून घ्यावी, जमीनीचा बाजार भावाने मोबदला द्यावा.
धरणाच्या उंची वाढीच्या प्रस्तावामुळे वाढणाऱ्या संभाव्य पाण्यापासून व डोंगर कपारीचा भाग असल्यामुळे वन्यजीवांपासून धोका उपन्न होऊन जीवित हानी होऊ नये म्हणून त्यांचे ही पुनर्वसन व्हावे.बेरोजगारांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे किंवा एक रक्कमी १० लाख रुपये मोबदला देण्यात यावा.
प्रकल्पस्थळी जनसुनावणी घेण्यात यावी.मूल्यांकनाबाबत फेर तपासणी करून योग्य मोबदला वाटप करण्यात यावा.नागरिक सुविधा पुरविण्यात येऊन पुनर्वसन करण्यात यावे.प्रचलित बाजार भावाप्रमाणे वाढीव मोबदला द्यावा , सर्वांचे एकत्रित पुनर्वसन करावे.भैरवगाव सानुग्रह प्रस्तावाची पूर्ण माहिती प्रकल्पग्रस्तांना द्यावी अशा ठळक १० मागण्या ग्रामस्थांच्यावतीने यावेळी पारकर यांच्यासमोर मांडण्यात आल्या.
यावर पारकर यांनी धरणाचे काम झाले पाहिजे.मात्र पोलीस फौज फाट्याचा वापर करून जर दंडेलशाही होत असेल तर या विरोधात ग्रामस्थांच्या बाजूने शिवसेना निश्चित पणे उभी राहील. नरडवे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देईल.असे ठामपणे सांगितले.तसेच सोमवारी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या निदर्शनास ही बाब आणून देवून नरडवे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्यात येतील अशी ग्वाही दिली.
नरडवे महमंदवाडी धरण प्रकल्पाचे काम पोलिस सर्वक्षणात करण्याची गरजच काय? येथील लोक चोर आहेत का?वाहतुकीची सोय नसल्याने कोणी दुचाकीवरून जात असल्यास त्यांना विनाकारण त्रास का दिला जातो?अशा विविध प्रश्नाचा भडिमार ग्रामस्थांनी केला.
नरडवे धरणाला आमचा विरोध नाही.मात्र दमदाटी करून पोलीस बळाचा वापर करत हे काम होत असेल तर अन्याया विरुद्ध लढणे हा आमचा हक्क असून त्यासाठी ही लढाई सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यापुढे पोलीस संरक्षण हटवून ग्रामस्थांना त्रास न होता काम नियमानुसार होण्यासाठी पालकमंत्री व खासदारांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल असे पारकर यांनी यावेळी सांगितले.