नोकरीत घेत नाहीत तोपर्यंत लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 07:17 PM2017-08-23T19:17:06+5:302017-08-23T19:18:22+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वेचे अधिकारी स्वत:च्या फायद्यासाठी प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेच्या नोकरीत सामावून घेतले जात नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहणार आहे. मात्र, लढा यशस्वी करायचा असेल तर आपण सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन कोकण रेल्वे प्रशासनाला जाब विचारला पाहिजे, असे कृती समितीचे संपर्कप्रमुख प्रभाकर हातणकर यांनी सांगितले. कोकण रेल्वे सुरू होऊन अनेक वर्षे झाली. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे आता कोणीही लक्ष देत नसल्याने ते संकटात सापडले आहेत.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेताना कोकण रेल्वे प्रशासन आडमुठे धोरण घेते. आडमुठ्या धोरणाबाबत भविष्यात विचारविनिमय करण्याच्या दृष्टिने कणकवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. कोकण रेल्वेतील प्रशासकीय अधिकाºयांच्या मुजोर व आडमुठ्या धोरणावर योग्य ती पावले उचलण्यासाठी तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे मत कृती समितीचे कार्याध्यक्ष विनय मुकादम यांनी व्यक्त केले.
प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. या आंदोलनात सर्वांनी सहभागी होऊन आपला लढा पूर्णपणे यशस्वी करण्याच्या दृष्टिने सज्ज व्हावे, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी उपस्थित सर्व प्रकल्पग्रस्तांना केले.
पुढील सभा रत्नागिरीत
आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी रेल रोको सारख्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला पाहिजे. तसेच आंदोलनपूर्व पुढील जाहीर सभा रत्नागिरी येथे रविवार दिनांक १० सप्टेंबर २०१७ रोजी निश्चित करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या सभेत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. रत्नागिरीत होणाºया सभेला बहुसंख्येने सर्व कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून आपली ताकद दाखवून द्यावी. त्याच दिवशी आपण पुढील आंदोलनाची तारीख जाहीर करू, असे कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी स्पष्ट केले.